गेवराई । मधुकर तौर
तालुक्यातील विविध शासकीय- निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरीकांनी कोवॅक्सीन लसीकरणाचा लाभ घेतला असून, आतापर्यंत तीन हजार आठशे एकतीस नागरिकांनी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात जाऊन लस टोचून घेतली आहे. फेब्रुवारी 2021 ते 18 मार्च 2021 पर्यंत 3079 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 182 नागरिक पॉझिटिव्ह निघाले. सदरील रुग्णांवर गेवराई व बीडला उपचार घेतले आहेत. दरम्यान, लस पूर्णपणे सुरक्षित असून, नागरीकांनी महामारीला घाबरून न जाता, कोविड चा प्रतिकार करण्यासाठी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कदम यांनी केले आहे.
दरम्यान, येथील उपजिल्हा रुग्णालयातला कोविड-19 विभाग नागरीकांच्या सेवेसाठी दक्ष असून, लसीकरण, ऐन्टीजन, आरटीपीसीआर चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयाने चाचण्यांवर भर दिला आहे. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विभागाने कळविले आहे. लसीकरण नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. नोंदणी करून झाल्यावर कोविड -19 लसीकरण विभागात संबंधित नागरिकांना लस दिले जाते. त्यासाठी ,रुग्णालया कडून कोणताही दर आकारला जात नाही. शासनाच्या आदेशानुसार लस मोफत दिली जात आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले असून, महीना भराच्या गॅपनंतर, या महामारीने पून्हा डोके वर काढले असून, रोगाची लागण झालेली रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे, प्रशासन हतबल झाले असून, तालुक्यातील कार्यक्षेत्रात अशंत: लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने चाचण्या आणि लसीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी विशेष विभाग सुरू करण्यात आला असून, कोविड - 19 लसीकरण विभागात 16 जानेवारी ते 19 मार्च 2021 पर्यंत जवळपास तीन हजार आठशे एकतीस नागरीकांना लस देण्यात आली आहे. लसीकरण विभागात श्रीमती वसावे, बेदरे, सदाफुले , मावळे, मंगेश खराद आदि कर्मचारी कार्यरत आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महादेव चिंचोळे यांच्या नेतृत्वाखाली
डॉ. राजेश शिंदे, डॉ. प्रवीण सराफ, डॉ. शेख , डॉ. आरबड, डॉ. राजेंद्र आंधळे, डॉ. काकडे , डॉ. मिसाळ यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी सेवेत आहेत. लसीकरणात जेष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जात आहे. सुरूवातीला आरोग्य विभाग, पोलीस अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांना व पत्रकारांना सदरील लस देण्यात आली होती. लस पूर्णपणे सुरक्षित असून, किरकोळ त्रास वगळता, लसीकरणाच्या गंभीर तक्रारी नसल्याची माहीती आरोग्य विभागाने दिली आहे. लस टोचून घेतल्यावर संबंधित नागरीकांना अर्धा तास आरोग्य विभागात बसवून ठेवले जाते. काही त्रास होत असल्यास तातडीने उपचार करण्यात येतात. त्यासाठी, वैद्यकीय अधिकार्यांची टीम कार्यरत ठेवण्यात आली आहे. लसीकरण संदर्भात नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी तालुक्यातील महत्त्वाचे अधिकारी , कर्मचार्यांनी लस टोचून घेऊन, नागरिकांना आवाहन केले. आमदार लक्ष्मण पवार यांनी ही उपजिल्हा रुग्णालयात जाऊन लस टोचून घेतली आहे. महामारी पासून बचाव करणे आवश्यक असून, मनात कसलीही भिती, किंतू परंतू न ठेवता नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आमदार पवार यांनी केले आहे. शहरातील हॉटेल चालक, मालक, कामगार, लहान-मोठ्या दुकानदारांनी चाचणी आणि लस टोचून घेतली आहे.
Leave a comment