यापूर्वी केलेल्या किती सूचना पूर्ण झाल्या?
कारकुनी कामे न करता परिस्थितीवर नियंत्रण ठेवा- सुनील केंद्रेकर यांच्या सूचना
बीड । वार्ताहर
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे आपल्या वेगळ्या कार्यशैलीने पूर्ण राज्याला परिचित आहेत. खोटे बोल पण रेटून बोल अशी जी पध्दत आहे, त्या पध्दतीला साजेशी भाषा प्रशासनात नेहमीच वापरली जाते. आयुक्त केंद्रेकर हे काम करुन घेण्यामध्ये माहीर आहेत. बीडच्या जिल्हाधिकारीपदी असताना त्यांनी प्रशासनातील अधिकार्यांनाही शिव्या घालून, अनेक चांगली कामे करुन घेतली. आता ते विभागीय आयुक्त आहेत. ते ज्या औरंगाबादमध्ये राहतात, त्या औरंगाबादची कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तेथील अधिकार्यांनाही त्यांनी टाईट मारणे गरजेचे आहे. बीडमध्ये काल त्यांनी कोरोना आणि जिल्हा प्रशासनातील कामाचा आढावा घेतला. हा आढावा घेताना जिल्हाधिकार्यांपासून तर कारकुनापर्यंत सर्वांचीच त्यांनी बिनपाण्याने केली. मूळातच आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार? केवळ शिव्या घातल्याने आणि टाईट बोलण्याने खरचं प्रशासन सुधारणार आहे का? पूर्वीचे जिल्हाधिकारी रेेखावार हे सुध्दा टाईट बोलायचे. त्यांच्या कार्यकाळात काय काम झाले. खरं तर बीडमध्ये प्रशासन नावाची गोष्ट राहिली नाही. कोणीही उठावं अन् मनाला वाटलं तस काम करावं अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. जिल्हा प्रशासनापेक्षा पोलीस प्रशासन, बांधकाम खाते, वनीकरण, आरोग्य खाते आदी विभागातील मनमानीकडेही देखील केंद्रेकरांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आढावा घेतला आणि केंद्रेकर निघून गेले. मात्र प्रशासनात काय बदल होईल हे आता येणारा काळच सांगेल.
जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांचा वेग वाढवा, अॅन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी ज्यांना लक्षणे असतील अशांची यादी तयार करून योग्य ती खबरदारी घ्या. पोलिस, आरोग्य विभाग आणि महसुल विभागाने यापुढे किमान तीन महिने तरी अधिक सतर्कतेने काम करावे.विनामास्क फिरणार्यांवर कठोर कारवाई करा, नियमांचे पालन लोकांकडून झालेच पाहिजे यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई वाढवा. तुम्ही सगळे अधिकारी कर्मचारी आताच सतर्क राहिला नाहीत तर बीड जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल. त्यामुळे कारकुनी धंदे करू नका, कोरोनाचा मृत्यूदर वाढला तर मी तुमच्यावर कारवाई करेल अशा स्पष्ट शब्दात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संताप व्यक्त करत जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांना कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
बुधवारी (दि.17) दुपारी 12 वाजता कोरोना उपाय योजनेसंदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी हॉलमध्ये आढावा बैठक झाली. केंद्रेकर म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा रुग्णालय येथे कोरोना टेस्टिंग लॅब सुरुवात केली जावे तसेच लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने कार्यान्वित केली जावी येत असे ते म्हणाले कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून शेजारच्या जिल्ह्यातील स्थिती गंभीर आहे याचा विचार करून बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात कोवीड केअर सेंटर येथे दाखल असलेल्या बाधित रुग्ण पैकी गंभीर व अतिगंभीर रुग्णांना रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करून उपचार केले जावेत.कोरोना संसर्गाची सौम्य बाधा असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरण आणि कोवीड केअर सेंटर मधून उपचार केले जावेत यामुळे ऑक्सिजन यंत्रणेने सज्ज असलेले बेड्स व व्हेंटिलेटर सुसज्जित आयसीयू यांचा गरजू गंभीर रूग्णांसाठी उपयोग होईल होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांना बाधित असल्याचा शिक्का हातावर मारला जावा तसेच या रुग्णांच्या घराबाहेर बाधित रुग्ण बाबत सूचना देणारे पोस्टर लावले जावे ज्यामुळे इतर नागरिकांना त्यांच्यापासून संपर्क टाळता येईल असे विभागीय आयुक्त म्हणाले.
आरटीपीसीआर तसेच अॅन्टींजेन टेस्ट वाढवा यासाठी बीडमध्ये चाचणी प्रयोग शाळा सुरू करा, दररोज किमान 300 ते 400 संशयितांची चाचणी झाली पाहिजे अशी व्यवस्था करा. विनामास्क फिरणार्यांना वेळप्रसंगी ‘प्रसाद’ द्या, दंडात्मक कारवाया वाढवा तसेच कोरोना बाधित रूग्ण वार्डाबाहेर येणार नाहीत आणि इतरत्र फिरणार नाहीत यासाठी वैद्यकीय अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करा अशा सूचनाही केंद्रेकर यांनी दिल्या. यापूर्वी घेतलेल्या बैठकीत मी ज्या सूचना दिल्या होत्या त्याची अंमलबजावणी करा.कोरोना संबंधी प्रशासकीय कामे विनाकारण लांबवू नका, सुपर स्प्रेडर शोधा, बंद असलेला ऑक्सिजन प्लँट काही करून तातडीने सुरू करा, कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, कोव्हीड केअर सेंटरमध्ये रूग्णांना व्यवस्थित सुविधा मिळत नाहीत अशा तक्रारी यापूर्वीही झालेल्या आहेत. त्यामुळे या तक्रारी येऊ देऊ नका यासाठी तहसीलदार, बीडीओ आणि एसडीओ यांनी जबाबदारी स्विकारून रूग्णांना चांगल्या सुविधा मिळवून द्याव्यात. जुन्या अधिकार्यांच्या चुका सांगून स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका अशा सूचनाही विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिल्या.जिल्हाधिकारी जगताप यांनी या प्रसंगी जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटर आणि खाजगी रुग्णालयांचे कोविंड उपचारांसाठी केलेले अधिग्रहण आदींबाबत माहिती दिली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोरोना विषयी माहिती दिली तसेच जिल्ह्यातील रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्री व सुविधांबाबत माहिती मांडण्यात आली. याप्रसंगी स्वा रा ती म ग्रा वैद्यकीय महाविद्यालयचे डॉ. अधिष्ठाता शिवाजी शुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सूर्यकांत गीते,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार आदी उपस्थित होते.
बाधित रूग्णांना भेटून धीर द्या
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. रूग्ण बाधित निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये भितीचे भावना निर्माण होऊ शकते अशावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी जसे की, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सीईओ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी त्या रूग्णांची भेट घेवून त्यांना आधार द्यावा, चांगले उपचार मिळतील याची हमी द्यावी, यामुळे रूग्णाला मोठा धीर मिळतो त्यामुळे या सूचनांची अंमलबजावणी करून घ्या. कोरोना कधी आणि कसा होतो हे रूग्णाला समजू शकत नाही. परंतु योग्य उपचाराने त्यावर मात करता येते हा विश्वास आरोग्य यंत्रणेने निर्माण करून द्यावा असे आवाहनही केंद्रेकर यांनी केले.
अधिकार्यांना झापले
आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बेजबाबदार अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत असतांना नियमाचे पालन न करणार्यांवर प्रशासनाकडून पाहिजे तशा पध्दतीने कारवाई होताना दिसत नाहीत, विनामास्क फिरणार्यावर थेट कारवाई झाल्या पाहिजेत असे सांगत बेजबाबदारीने काम करणार्या अधिकार्यांना थोडीतरी वाटली पाहिजे अशा शब्दात केंद्रेकरांनी अधिकार्यांना खडेबोल सुनावले.
विनामास्क रिक्षाचालकांवर कारवाई करा
प्रवासी वाहतूक करणार्या ऑटो रिक्षामधून एकावेळी किमान दोन ते तीन प्रवासी शहरांतर्गत प्रवास करत असतात. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक रिक्षाचालकाने सातत्याने मास्क वापरला पाहिजे.बुधवारी बीड शहरात आल्यानंतर मला अनेक रिक्षाचालक विना मास्क रिक्षा चालवताना आढळून आले. आरोग्य आणि पोलीस प्रशासनाने अशा रिक्षाचालकांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, यासाठी जिल्हा पोलीस दलाने पुढाकार घ्यावा अशा सूचना नाही आयुक्त केंद्रेकर यांनी पोलीस अधीक्षक आर.राजा यांना आढावा बैठकीदरम्यान केल्या.आता या सूचनांचे रिक्षाचालक कितपत पालन करतात हे येणारा काळच ठरवणार आहे.
जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती
आढावा बैठकीसाठी बीडमध्ये दाखल झालेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालय परिसरात बंद अवस्थेत असलेल्या ऑक्सीजन प्लांटची माहिती जाणून घेतली. कोणत्याही परिस्थितीत हा ऑक्सीजन प्लांट तातडीने सुरु करून घ्यावा अशा सूचना त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या. कोरोना वार्डातील रुग्णांची सुरक्षितता तसेच त्यांना सर्व सुविधा वेळेवर पोहोचवाव्यात असे निर्देशही केंद्रेकर यांनी दिले. यावेळी केंद्रेकर यांना जिल्हा चिकित्सक सूर्यकांत गित्ते यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
परवानगीसाठी वेळखावूपणा नको
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी दोन तास आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनाही अनोखे उदाहरण दिले. कोरोना उपायोजनेच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाचा कारभार कसा संथ आणि वेळखावू आहे हे सांगतांना केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी जगताप यांना उद्देशून ‘कलेक्टर साहेब तुमच्या अंगाला लागलायं जाळं, तुम्ही पेटलेले आहात, समोर पाच आग विझवण्यासाठी बादली घेवून उभे आहेत, अन् तुम्ही त्यांना सांगताय की, अॅप्लीकेशन द्या, मै बाद मै देखुंगा...इतकी संथ गती एखाद्या कामाला परवानगी द्यायला नकोय. असे असेल तर कोरोनावर नियंत्रण कसे मिळवता येईल? त्यामुळे अधिकार्यांवर जबाबदार्या निश्चित करा,कारभार गतीमान करा अशा स्पष्ट सूचनाही दिल्या.
जिल्हा माहिती कार्यालयाचा असाही अवमेळ!
जिल्हा माहिती कार्यालयाने आयुक्त केंद्रेकर यांच्या आढावा बैठकीचे वृत्त बुधवारी रात्री व्हॉटसअॅप गु्रपवरुन माध्यमांना पुरवले, पण बातमी देताना जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी झोपेत होते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या आढावा बैठकीची बातमी देताना माहिती कार्यालयाने चक्क हेंडिगच चुकवले. ‘कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणार्यांवर कडक कारवाई करा-विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर’ असा मथळा देवून बातमी पुरवली. अन् नंतर उशिरा चूक कळल्यानंतर तो मथळा बदलला. तोपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते. त्यामुळे केंद्रेकरांनी पोटतिडकीने दिलेल्या सूचनांवर या वृत्तामुळे पाणी फेरले जाणार होते, पण माध्यमांनी बातम्या सतर्कतेने केल्या त्यामुळे चूकीचे वृत्त लोकांपर्यंत पोहचले नाही.
Leave a comment