गेवराई तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी निधी द्या!
आ.पवारांचे विधानसभेच्या दारातच उपोषण!
गेवराई । वार्ताहर
शासनाने वाळूचे टेंडर काढताना अपसेट किंमत भरमसाठ वाढल्याने गोदावरी व सिंदफणा नदीवरील वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला बेभाव वाळू घ्यावा लागत आहे त्यामुळे वाळूच्या टेंडरची अपसेट किंमत शासनाने कमी करून जनतेला कमी किमतीत वाळू उपलब्ध करून द्यावी, अवजड वाहनामुळे उध्वस्त झालेल्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी आमदार लक्ष्मण पवार व आमदार राजेश पवार यांनी मुंबई येथे विधान भवनासमोर मंगळवार दि. 2 रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भातातडीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार लक्ष्मण पवार व आमदार राजेश पवार यांनी उपोषण मागे घेतले.
गेवराई मतदारसंघातील गोदावरी व सिदफना नदी पाञातुन अवजड वाहनाने बेसुमार अवैध वाळु उपसा केला जातो. त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसुल बुडतो, अवजड वाहनाने वाळू वाहतूक होत असल्याने रस्त्यांची दुरावस्था होते व सुसाट वेगाने वाहणार्या वाहनांमुळे नागरिकांच्या जीवितास देखील धोका निर्माण होतो. शिवाय महसूल प्रशासनाच्या धोरणामुळे सर्व सामान्य जनतेला बेभाव वाळू घ्यावी लागते. या सर्व बाबतीत तहसीलदार, जिल्हाधिकारी व सचिवांपर्यंत वेळोवेळी मागणी करून निर्णय न झाल्यामुळे आमदार लक्ष्मण पवार यांनी शेवटी मुंबई येथील विधानभवना समोरच मंगळवार दि. 2 मार्च रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. यामध्ये टेंडर काढताना वाळुची अपसेट किमंत कमी करावी, वाळु वाहतूक ही टिपर व हायवा ऐवजी फक्त ट्रॅक्टरनेच करावी, वाळु वहातूकीमुळे उध्वस्त झालेले रस्ते तात्काळ दुरूस्त करून द्यावेत, गोरगरिबांना घरकुलासाठी मोफत वाळु द्यावी, तसेच सर्व सामान्य जनतेला कमी किंमतीत उपलब्ध करून द्यावी. या मागण्याचे फलक तयार करून आमदार लक्ष्मण पवार व नायगावचे आमदार राजेश पवार यांनी उपोषण सुरू केले होते. अत्यंत संवेदनशील विषयाची दखल घेऊन
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली व उपोषणास पाठिंबा दर्शविला. महसुल मंञी बाळासाहेब थोरात मुंबईत नसल्यामुळे त्यांच्याशी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी संपर्क केल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेबाजी थोरात यांनी बुधवार दि. 3 मार्च रोजी विधान भवनात दोन्ही आमदारांच्या उपस्थित तात्काळ बैठक लावून सर्व मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणीस याच्या उपस्थित आ.लक्ष्मण पवार व व राजेश पवार यांनी उपोषण तुर्तास मागे घेतले आहे.
Leave a comment