बीडमध्ये विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाया सुरु

बीड । वार्ताहर

कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून आता पुर्वीप्रमाणेच निर्बंध घालण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या अनुषंगाने शनिवारी (दि.20) सकाळपासून बीड जिल्ह्यात विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणार्‍यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लगले. शहर पोलीसांनी दुपारी 2 वाजेपर्यंत 25 जणांवर कारवाई केली तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत ही विनामास्क फिरणार्यांवर कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत. दुपारपर्यंत 35 दुचाकी चालकांवर कारवाई झाल्याचे पोलीसांनी सांगितले. याशिवाय बीड शहर वाहतुक शाखेकडून 50 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

 कोरोनाचा संसर्ग वेगाने होवू लागल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. दोन दिवसापूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हीसीद्वारे आढावा घेत कोरोनाच्या अनुषंगाने  तातडीने अ‍ॅक्शन घ्या असे निर्देश दिले होते. महत्वाचे हे की, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या वेगाने वाढवा असे आदेशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. शिवाय मंगल कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी संबंधीतावर दंडात्मक कारवाया कराव्यात तसेच खाजगी शिकवणी वर्ग चालकांनाही 50 टक्क्यापेक्षा अधिक विद्यार्थी बसवल्यास कारवाईची तंबी देण्याचे आदेश दिले होते.यानंतर यंत्रणा कामाला लागली असून आज शनिवारी (दि.20) सकाळपासून शहरात विनामास्क दुचाकीवर फिरणार्या नागरिकांना दंडात्मक कारवाया सुरु करण्यात आल्या. आता ही मोहीम आगामी काही दिवस सुरु ठेवली जाणार आहे. नागरिकांनी कोरोनापासून दूर राहण्यासाठी व या महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

 

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर होणार दंडात्मक कारवाई

कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

मंगल कार्यालय, शॉपिंग मॉलसह सार्वजनिक ठिकाणी वॉच

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत. शनिवारी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी सर्व यंत्रणेला आदेश जारी केले आहेत. यानुसार सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच सर्व हॉटेल, उपहारगृहे याठिकाणी मास्क व सॅनिटायझरचा वापर सातत्याने करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी नव्याने उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सर्व बीडीओ, पोलीस निरीक्षक, न.प. प्रशासन यांच्याकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा-महाविद्यालय, नाट्यगृह,चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मीक स्थळे आदी गर्दी होणार्‍या ठिकाणी आचानक भेट देवून तपासणी केली जाणार आहे. मर्यादिपेक्षा जास्त लोक विनामास्क आढळुन आल्यास त्यांच्यावर पहिल्यावेळी नोटीस देवून 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच दुसर्‍यावेळी अशीच स्थिती आढळुन आल्यास 1 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. यापुढे कोणत्याही खासगी व सार्वजनिक कार्यक्रमासाठी संबंधीत पोलीस ठाण्याची रितसर परवानगी लागणार आहे. कार्यक्रमस्थळी कारोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहेत. ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न होईल तेथील परिसर कंटेन्टमेंट झोन घोषीत केला जाणार आहे. या शिवाय इतरही तातडीच्या उपाय योजना राबवल्या जाणार आहेत. नागरिकांनी कोरोना सदृष्य लक्षणे जाणवल्यास स्वत:हून रुग्णालयात जावून चाचणी करण्यात यावी असे आवाहन ही प्रशासनाने केले आहे.

 

पुढील 15 दिवस महत्त्वाचे; सहवासितांच्या शोधावर भर

 

रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांचा शोध घेणे कमी केल्यामुळे रुग्णवाढीचा धोका संभवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने सहवासितांचा शोध व निदान यावर अधिकाधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. एका रुग्णामागे किमान २० ते ३० व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. त्यांच्या चाचण्या करून निदान प्रक्रियेत आणण्यात येईल, असे आरोग्य विभागाने सांगितले. तर, पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे असून प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले, सहवासितांचा शोध जलदगतीने घेण्याबाबत जिल्हा आणि पालिका पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. याविषयी विशेष परिपत्रकही काढण्यात आले आहे. रुग्णवाढीचा धोका ओळखून आरोग्य विभाग सर्व पातळ्यांवर सतर्कता बाळगत आहे.

रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांचे निदान करून त्यांना उपचारप्रक्रियेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. यापूर्वी, राज्यासह मुंबईत कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात सहवासितांच्या शोधावर अधिक भर देण्यात आला होता. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूंत कमालीची घट झाल्याचे दिसून आले. शिवाय, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला. महत्त्वाचे म्हणजे, पाॅझिटिव्हिटी दर हा चार टक्क्यांच्या खाली घसरल्याचे दिसून आले.

 

संसर्ग आटाेक्यात येईल; प्रशासनाचा दावा

 

दोन व्यक्तीत सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यात काेरोनाबाधित रुग्ण वाढल्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. घटलेल्या ‘आरटीपीसीआर’ आणि ‘अँटिजेन’ चाचण्या वाढवल्या आहेत. या चाचण्यांतून नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. चाचण्यांची संख्या वाढवल्यानंतर रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्याही चाचण्या होत असल्याने संसर्ग आटोक्यात येईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.