विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे आदेश
बीड जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवण्याचेही निर्देश
बीड । वार्ताहर
मागील आठ दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीड जिल्हाधिकार्यासह सीईओ आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. यापुढे बीड जिल्ह्यात लग्न समारंभासाठी 50 व्यक्तींनाच परवानगी द्या.मंगल कार्यालयांची तपासणी करुन सक्त सूचना द्या. कोचिंग क्लासेसमध्ये अचानक छापे मारुन त्यांना सुरुवातीला नोटीस द्या, त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यान थेट कारवाई करा असे निर्देश देण्यात आले आहेत.
आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निर्देशानंतर बीड जिल्हा प्रशासनही सतर्क झाले असून पुन्हा कोरोना विषयक उपाययोजनांच्या अनुषंंगाने सतर्क राहण्याच्या सूचना सर्व नगरपालिका, सर्व तहसिलदार आणि गटविकास अधिकार्यांना दिल्या आहेत. ज्या मंगल कार्यालयामध्ये कोविड विषयक नियमांचे पालन करून लग्न समारंभ पार पडत नाहीत अशा मंगल कार्यालयांना नोटीस देवुन नियमानुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी. त्याचबरोबर कोचिंग क्लासेसच्या ठिकाणी आसन क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त, विना मास्क, विना सॅनिटायझर तसेच 6 फुटांचे सामाजिक अंतर न ठेवता कोचिंग क्लासेस चालु असतील तर त्यांना नोटीस देवुन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करा. यासाठी दोन अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. ग्रामीण भागातील संबंधित यंत्रणेलाही याबाबत आदेशीत करण्यात आले असुन लग्न समारंभ व कोचिगं क्लासेसमध्ये कोविड विषयक नियमांचे पालन होत नसेल तर कारवाईच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ज्या अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना मंगल कार्यालये व कोचिंग क्लासेसच्या तपासण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता यापुढे लग्न सोहळ्यासाठी केवळ 50 व्यक्तींचीच परवानगी असणार आहे. तेही मास्क आणि अन्य नियम पाळणे संबंधितांना पाळणे बंधनकारक राहणार आहे.
तातडीने अॅक्शन घ्या-सुनील केंद्रेकर
आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे सुचना केल्या आहेत. त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असुन लग्नामध्ये होणारी गर्दी रोखण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. मोठ्या लग्नसोहळ्यावर तातडीने अॅक्शन घ्या, त्यांच्यावर कारवाई करा, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात टेस्टींग वाढवा, प्रत्येकाला मास्क बंधनकारक करा, आत्ताच आपण काळजी घेतली तर आपल्याला कोरोनाचा संसर्ग रोखता येईल अशा सूचनाही केंद्रेकरांनी दिल्या आहेत.
Leave a comment