बीड । वार्ताहर
तालुक्यातील मांजरसुंबा ते शहरातील बार्शी नाका बस प्रवासादरम्यान एका प्रवाशी महिलेच्या गळ्यातील 1 लाख वीस हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिणे शेजारी बसलेल्या दोन अनोळखी महिलांनी लंपास केले. मंगळवारी (दि.19) सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
विजया गोरोबा गायामुदे (47, रा.दिपिका अपार्टमेंट,कल्याण) असे त्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी त्या मांजरसुंब्याहून बीडकडे येत होत्या. या दरम्यान त्यांच्या शेजारी सीटवर बसलेल्या दोन अनोळखी महिलांनी विजया यांच्याकडील तीन तोळे सहा मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे 1 लाख 20 हजार रुपये किमंतीचे गंठण हातोहात लंपास केले. बार्शी नाका परिसरात आल्यानंतर प्रवाशी महिलेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पेठ बीड ठाण्यात दोन अनोळखी महिलांविरुध्द फिर्याद नोंदवली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
माजलगाव बसस्थानकातही दागिणे चोरी
माजलगाव-अंबाजोगाई दरम्यान प्रवास करणार्या एका प्रवाशी महिलेच्या कापडी पर्समधून चोरट्यांनी 42 हजार 450 रुपये किमंतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. सोमवारी (दि.18) दुपारी दिड वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी अशोक विष्णू होगाडे (रा.लावणी ता.मंठा, जि.जालना) यांच्या फिर्यादीवरुन माजलगाव शहर ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment