’वंचित’च्या जिल्हाध्यक्षासह 10 जणांवर गुन्हा

बीड । वार्ताहर

राज्य परिवहन महामंडळाच्या बीड येथील विभागीय भांडार शाखेतील सहायक पदावर कार्यरत महिलेला निलंबित का केले अशी विचारणा विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांच्या दालनात घुसून शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी तसेच खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत अरेरावी केल्याची घटना बुधवारी (दि.20) दुपारी 4 वाजता घडली. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षासह दहा जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
पोलीसांच्या माहितीनुसार, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार, विभागीय भांडार शाखेतील सहायक पदावरील महिला कर्मचार्‍याने नियोजित काम करण्यास नकार दिल्याने पर्यवेक्षकाच्या अहवालावरुन 15 जानेवारी रोजी विभागीय भांडार अधिकार्‍यांनी सदरील महिला कर्मचार्‍यास निलंबित केले आहे. याशिवाय इतर तीन कर्मचार्‍यांवरही कामात हलगर्जी केल्याचा ठपका ठेऊन निलंबनाची कारवाई केलेली आहे. दरम्यान, महिला कर्मचार्‍याने निलंबनाची कारवाई करणार्‍या पर्यवेक्षकाविरुध्द मारहाणीची तक्रार विभागीय भांडार अधिकार्‍यांकडे केलेली आहे. दरम्यान,बुधवारी दुपारी 4 वाजता विभागीय नियंत्रक जगनोर हे दालनात नियमित काम करत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शिवराज बांगरसह 9 ते 10 जण दालनात आले. त्यांनी ’महिला कर्मचार्‍यास निलंबित का केले’ अशी विचारणा केली. त्यावर परस्परविरोधी तक्रारी असून कोणावरही एकतर्फी कारवाई केलेली नसल्याचा खुलासा जगनोर यांनी केला. त्यावर ’तुला रस्त्यावर चालणे मुश्कील होईल असे म्हणत टेबलवरील लाकडी ट्रे उचलून अर्वाच्च शिवीगाळ करत ते सर्व जण अंगावर धावून आले. इतर कर्मचार्‍यांनी सोडवासोडव केल्यावर ’तू बाहेर निघ तुला दाखवतो’ असे म्हणत विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा खुर्ची उचलून ते अंगावर आले. जगनोर यांच्या फिर्यादीवरुन जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर, प्रशांत बोराडे, राजेंद्र कोरडे, राजेंद्र कोरडे, उमेश तुळवे, किरण वाघमारे, सचिन मेघडंबर व इतर तीन यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन धमकावल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, उपनिरीक्षक शैलेश शेजुळ यांनी सहकार्‍यांसह विभागीय नियंत्रक कार्यालयात धाव घेतली. तिघांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु असल्याचे उपनिरीक्षक शेजुळ यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.