बारकोड स्कॅन करुन व्यापार्‍याचे 47 हजार तर

अमाउंट रिप्लेसमेंट’ची ऑफर देत महिलेचे 51 हजार लांबवले

बीड । वार्ताहर

मोबाइलच्या विविध अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार जिल्ह्यात वाढू लागले आहेत. बीड शहरातील एका व्यापार्‍याला  पाणी टाकी खरेदीची रक्कम गुगल पे करतो, असे सांगत एका भामट्याने व्यापार्‍याच्या खात्यातून काही मिनिटात 47 हजारांची रक्कम परस्पर विड्रॉल केली तर दुसर्‍या घटनेत ‘फोन पे’ कंपनीकडून तुम्हाला ‘अमाउंट रिप्लेसमेंट’ची ऑफर असून त्यासाठी ‘युपीआय’ क्रमांक पाठवण्याचे सांगत महिलेच्या खात्यावरील 51 हजार 200 रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली गेली.
संतोष चौरे असे ऑनलाईन फसवणूक झालेल्या व्यापार्‍यांचे नाव आहे. त्यांचे बीड शहरातील सावतामाळी चौकात दुकान आहे. 2 डिसेंबर रोजी एका अनोळखी इसमाने चौरे यांच्याशी संपर्क केला. ‘पाण्याच्या टाक्याचे 13 हजार 600 रुपयांचे बील तुमच्या खात्यावर जमा करतो’असे सांगीतले. नंतर त्याने चौरे यांचा अकांऊट नंबर घेवून गुगल पे च्या माध्यमातून बारकोड स्कॅन करण्याचे सांगितले. चौरेनी बारकोड स्कॅन केल्यानंतर एक मिनिटाच्या फरकाने एकुण 9 ट्रान्जेक्शन होवून 47 हजारांची रक्कम विड्राल झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापारी चौरे यांनी शुक्रवारी बीड शहर ठाण्यात फिर्याद नोंदवली. अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
फसवणूकीची दुसरी घटना शिवाजीनगर ठाणे हद्दीतील एका महिलेच्या बाबतीत घडली. सुनीता जायभाये (रा.बीड) यांना शुक्रवारी (दि.11) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एका भामट्याने कॉल केला. ‘फोन पे कंपनीचे राकेश शर्मा बोलत आहे, तुम्हाला ‘फोन पे’ कंपनीकडून ‘अमाउंट रिप्लेसमेंट’ची ऑफर आहे’ असे सांगत नंतर त्या भामट्याने जायभाये यांना ‘तुम्ही फोन पे अ‍ॅप उघडा. व एका अंकाऊंटवर तुमचे फोन पे चे युपीआय नंबर टाका, त्यानंतर तुम्हाला पैसे जमा होतील’ असे सांगत विश्वास संपादन केला. ही ऑनलाईन प्रक्रिया करताच जायभाये यांच्या खात्यातून तीन वेळेस 4800, एक वेळेस 5 हजार, त्यानंतर 9800, नंतर दोन वेळेस 10 हजार व नंतर 2 हजार अशा आठ ट्रान्जेंक्शनमधून सुमारे 51 हजार 200 रुपयांची रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. त्यानंतर जायभाये यांनी शिवाजीनगर ठाण्यात येवून तक्रार नोंदवली. या प्रकरणी अज्ञाताविरुध्द फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पासवर्ड,ओटीपी शेअर करु नका

ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. बहुतांश नागरिक बँकांचे व्यवहार प्रत्यक्ष बँकेत जावून करण्यापेक्षा इंटरनेट बँकिंगव्दारे करतात; मात्र ऑनलाईन बँकिंग करताना कोणत्याही अनोळखी लिंक अथवा पासवर्ड,ओटीपी कुठल्याही व्यक्तीसोबत शेअर करु नका असे आवाहन बीड पोलीस दलाच्या सायबर सेलने केले आहे.

कशी होते फसवणूक?

गुगलच्या यूझर जनरेटेड कंटेंट पॉलिसीअंतर्गत कुणीही गुगल मॅप्सच्या पेजवरील माहिती एडीट करु शकतो. यामध्ये फोन नंबर आणि पत्ता या माहितीचाही समावेश असतो.

लोकांची फसवणूक करण्यासाठी हे स्कॅमर्स गुगल मॅप आणि गुगल सर्च कंटेंटवरील बँकेची माहिती एडीट करून चुकीची माहिती म्हणजेच चुकीचा फोन नंबर आणि पत्ता टाकतात.

गुगलवर जे काही दाखवण्यात येतं ते सर्व खरं असतं, असा आपला समज आहे. याचाच फायदा स्कॅमर्सला होतो. गुगलवर दिलेला बँकेचा नंबर हा विश्वासार्ह असल्याचं समजत आपण त्यावर कॉल करतो. कॉल उचलणारी व्यक्तीही बँकेची कर्मचारी असल्याप्रमाणे बोलते. त्यामुळे समोरील व्यक्ती ही फ्रॉड असल्याचं आपल्याला कळत नाही. त्यानंतर समोरील व्यक्ती आपल्याला आपल्या बँक खात्यासंबधी जी काही माहिती मागेल ती आपण सांगतो. एकदा माहिती मिळाली की बँक खात्यातून पैसे काढण्याचे अनेक पर्याय असतात. ज्याचा वापर करून हे स्कॅमर्स आपली फसवणूक करतात.

ग्राहक गुगलवर बँक काँटॅक्ट डिटेल्स सर्च करतात आणि त्यावर दिलेल्या नंबरवर कॉल करतात. कधीकधी हे नंबर चुकीचे असतात. पण ग्राहकांना याची माहिती नसते. त्यामुळे ते फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला बँकेचा कर्मचारी समजून आपल्या खात्याची गोपनीय माहिती देतात. यामध्ये सीव्हीव्ही नंबर आणि पिन यांचाही समावेश असतो. ज्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात आणि तेव्हा तुम्हाला फ्रॉड झल्याचे समजते.

बँकेकडून वारंवार हे सांगितल्या जातं की आपल्या बँक खात्या संबधी माहिती, जसे की, खाते क्रमांक, कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक, पिन कुणासोबत शेअर करू नये. तसेच बँक कधीही आपल्याला आपले सीव्हीव्ही क्रमांक किंवा पिन विचारत नाही, असेही सांगितले जाते. रोज मोबाईलवर त्यासंबंधीचे जागरूकता पसरविणारे मेसेज येत असतात. तरीही आपण अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडतो.

त्यामुळे कधीही आपला पिन, सीव्हीव्ही क्रमांक, कार्ड क्रमांक कुणाला सांगू नका. बँक काँटॅक्ट डिटेल्स आपल्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून घ्या. त्यासाठी गुगलवर अवलंबून राहू नका. बँकेसंबधी ऑनलाईन व्यवहार करताना किंवा कस्टमर केअरशी बोलताना सावधानता बाळगा.

 यात तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. एटीएम कार्डची माहिती घेऊन पैसे काढून घेणे, एटीएम कार्ड क्लोनिंग करून फसवणूक करणे, एखादी लिंक व्हॉट्सअॅपवर पाठवून ती उघडल्यानंतर मोबाइलवर डाटा घेऊन बँक खात्यातील पैसे काढून घेणे, अशा तक्रारी येत आहेत. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.