जालना
अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरयांचा शिवसेनेमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. खुद्ध शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीच यावर शिक्कामोर्तब केले आहे. तर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी ऊर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा देत शिवसेनेला टोला लगावला आहे.
जालन्यामध्ये पत्रकार परिषदेत प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर हे केंद्राच्या पीएम निधीमधून आले आहे, यात राज्याच्या कोणताही वाटा नाही. कोविड सेंटर उभारण्यात राज्य सरकारकडून अक्षम्य दिरंगाई झाली आहे', अशी टीका प्रीतम मुंडे यांनी केली.
'ऊर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहे, असं ऐकलं आहे. मातोंडकर यांना माझ्या शुभेच्छा आहे. त्यांनी अगोदर काँग्रेसकडून नशीब आजमावलं त्यात त्यांना अपयश आलं होतं. आता बघू त्यांचं नशीब बदलते की शिवसेनेचं नशीब बदलते', असा टोलाही प्रीतम मुंडे यांनी सेनेला लगावला.
'कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या बाबतीत सुडाचे राजकारण करणारे हे सरकार आहे. या सरकारने आमच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे महाविकास आघाडीचे बिघाडी आणि स्थगिती सरकार आहे', अशी टीकाही मुंडे यांनी केली.
'राज्य सरकारने फक्त बदल्या आणि नवीन गाड्या घेण्याचा काम केलं आहे. आमच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना अनेक माध्यमातून मदत दिली. मात्र, आताचे राज्य सरकार सर्व बाबतीत सपशेल अपयशी ठरले आहे. आमच्यासोबत असताना शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत मागणाऱ्यांना आज स्वतःची सरकार असताना शेतकरींचा विसर पडला आहे' अशी थेट टीका प्रीतम मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.
'महिला,विद्यार्थी, तरुण, मजूर कोणत्याचं घटकाला न्याय देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राज्य सरकारची वर्षपूर्ती झाली असली तरी जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती झाली आहे. त्यामुळे लवकरच सरकार जिथून आले तिथे परत जाणार आहे, असं भाकीतच प्रीतम मुंडे यांनी वर्तवलं आहे.
स्वसुरक्षेसाठी महिलांना हत्यारापेक्षा शालेय स्तरापासून स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे. अशी पंकजा मुंडे यांनी भूमिका मांडली होती. जर सरकार असते आमची तर त्याची अंमलबजावणी झाली असती, असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या.
शेतकरी कायद्याबाबत लोकांची दिशाभूल करून केंद्र सरकरबाबत रोष निर्माण केला जात आहे. पत्रकार, कलाकार आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून म्हणून केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार हे स्वतः अस्ताकडे चालले आहे, अशी टीकाही प्रीतम मुंडे यांनी केली.
Leave a comment