तालुक्यात तीन कारखाने चालतील एवढे उसाचे क्षेत्र
गेवराई । मधुकर तौर
तालुक्यातील विविध भागात उसाचे क्षेत्र वाढले असून, जय भवानी कारखान्याची गाळप क्षमता लक्षात घेता मराठवाड्यातल्या कानाकोपर्यातून जवळपास चौदा कारखान्याच्या राहुट्या जागोजाग उभ्या राहील्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील कार्यक्षेत्रात 19 लाख मे. टन उस उभा असून, उसतोडी संदर्भात शेतकर्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून, आमदार लक्ष्मण पवार यांनी कारखाना प्रशासनाशी संपर्क साधण्याची भूमिका घेतली आहे.
दसर्याच्या मुहूर्तावर मराठवाड्यातील जवळपास सगळ्याच उस कारखान्याची धुराडे पेटले आहेत. कारखाने सुरू झाले असून, उस तोडणी आणि वाहतूक सुरू झाली आहे. त्या आधी, उस वाहतूक व मजुरांचा प्रश्न निकाली निघाला आहे. आता, शेतकर्यांना उसाच्या मोबदल्यात योग्य भाव जाहीर झाला पाहिजे, अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, गेवराई तालुक्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, जय भवानी सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता लक्षात घेता, बाहेरचे कारखान्यांनी येथील कार्यक्षेत्रात प्रवेश केला आहे.
जय भवानी गेल्या काही वर्षांपासून नियमित सुरू असल्याने शेतकरी दरवर्षी उस लागवड करू लागला आहे. तसेच, अन्य कारखाने बांधावर येऊन, उस घेऊन जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून, शेतकरी उस लागवडी कडे वळला आहे. त्यामुळे, यंदाच्या वर्षी उसाचे क्षेत्र वाढले आहे. पुढेही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शासनाच्या आणि कारखान्याच्या दरात तफावत असते. शासन एफआरपी जाहीर करते. मात्र , रिकव्हरी रेट पाहून कारखाना व्यवस्थापन भाव जाहीर करते.मराठवाड्यातील, उस्मानाबाद, जालना, बीड, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील वैद्यनाथ, एस.पी. शुगर ,केदारेश्वर, रामेश्वर, छत्रपती , गंगा मैय्या, बारामती अँग्रो, जय महेश, भेंडा, नाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून उस नेला जात आहे. जागोजाग उसतोडणी मजुरांच्या राहुट्या उभ्या आहेत. उस तोडणी जोरात सुरू आहे. बैलगाडी, ट्रक , ट्रॅक्टरमधून उ नमस्कार वाहतूक सुरू आहे. मजुरांची दिवाळी ही उसाच्या फडातच गेली. कोरोनो सारख्या महामारीच्या सावटाखाली उस तोडणी सुरू असून, कारखाना, मुकादम किंवा शासनाकडून उस तोड मजुरांना मास्क, सॅनेटायझर सारख्या कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत, अशी तक्रार मजुरांनी केली आहे. सद्यस्थितीत कोणत्याही साखर कारखान्याने भाव जाहीर केलेला नाही. त्यामुळे, शेतकर्यांना किती रुपयाचा भाव मिळणार, हे पूर्णपणे गुलदस्त्यात आहे. पहिला हप्ता कधी जाहीर होणार, चांगला भाव मिळणार की नाही,असा प्रश्न पडला आहे. तालुक्यात 86.0.32, 8005,90.97, 1005 आणि 265 जातीचा उस उपलब्ध आहे. यापैकी 265 जातीच्या उसाला कमी दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे, विविध कारखाने या जातीचा उस घेऊन जात नाहीत. त्याचा गोडवा कमी असल्याने अडचण येत असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, तालुक्यातील विविध भागात जवळपास 19 लाख मे. टन उस उभा असल्याचा अंदाज आहे.
तीन कारखाने चालतील?
गेवराई मतदारसंघात उस लागवडीचे क्षेत्र बर्यापैकी आहे. या परीसरात एकच कारखाना आहे. माजी मंत्री शिवाजीराव पंडीत यांनी हा कारखाना उभा केला आहे. सध्या कारखाना सुरळीत सुरू आसल्याची चर्चा आहे. त्यामुळे, चांगले गाळप होण्याची शक्यता आहे. कारखाना भाव काय देणार, या विषयी तर्क लढवले जात आहेत. जय भवानी सोडता, या ठिकाणी एक ही कारखाना नाही. दोन तीन चार वेळा कारखाना उभारणीसाठी प्रयत्न झाले. मात्र, या प्रयत्नांना मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही. माजी मंत्री बदामराव पंडीत, जिल्हा परिषद सदस्य सुरेश हात्ते, संजय काळे, बाबासाहेब भोसले यांनी कारखाना उभारण्याचा संकल्प केला होता. जागा उपलब्ध करून, शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत होता. दुर्दैवाने तो पूर्ण होऊ शकला नाही, काही अडचणी आल्याने कारखाना कागदावरच राहीला.
तीन ठिकाणी गुर्हाळे
उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने काही उद्योजकांनी गुर्हाळे सुरू करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. जातेगाव येथे 10 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट उभा राहू लागला आहे. याच धर्तीवर मालेगाव , सोनवाडी येथे ही गुर्हाळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत असल्याची माहीती मिळाली आहे.
Leave a comment