ग्राहकाचा मोबाईल दुरुस्त करुन देण्यास नकार
बीड । वार्ताहर
‘आयबॉल’ या नावाजलेल्या कंपनीकडून ग्राहकाने खरेदी केलेल्या मोबाईलचा टचस्क्रीन खराब झाल्यानंतर तो कंपनीच्या सर्विस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिला;मात्र स्पेअरपार्टचे उत्पादन बंद झाल्याचे कारण पुढे करत मोबाइल दुरुस्त केला नाही. या प्रकरणात ग्राहकाला 14 हजारांची भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले. त्यानंतरही कंपनीने भरपाई न दिल्याने आता या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप परसरामपुरिया यांच्यासह सर्विस सेंटर मालक घोडके या दोघांविरुध्द जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अटक वॉरंट जारी केले आहे.
सुनील जोशी या ग्राहकाने 7 फेबु्रवारी 2016 रोजी बीड शहरातील सुभाष रोडवरील पुष्कर मोबाइल शॉपीतून ‘आयबॉल’ कंपनीचा नऊ हजार रुपये किमंतीचा एक मोबाइल खरेदी केला होता. दरम्यानच्या काळात त्या मोबाइलचा टचस्क्रीन खराब झाला. त्यानंतर जोशी यांनी आयबॉल कंपनीच्या बीडमधील अधिकृत सर्विस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिला होता; मात्र कंपनीने स्पेअरपार्टचे उत्पादन बंद केल्याचे कारण पुढे करत सर्विस सेंटर चालकाने तो मोबाइल दुरुस्त करण्यास नकार दिला. अखेर सुनील जोशी यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये धाव घेतली.
या प्रकरणात आयबॉल कंपनीने संबंधित ग्राहकाला दर साल शेकडा 9 टक्के व्याजदराने 14 हजारांची रक्कम परत करावी असे आदेश 8 जानेवारी 2020 रोजी ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले होते. परंतु त्यानंतरही कंपनीने जोशी यांना सदरील रक्कम परत केली नाही. नंतर जोशी यांनी कंपनीच्याविरुध्द वसुलीचा दावा दाखल केला. यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष श्रीधर के.कुलकर्णी, सदस्य मेघा गरुड व सदस्य अपर्णा दीक्षित यांनी ‘आयबॉल’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप परसरामपुरिया व सर्विस सेंटरचे मालक घोडके यांच्याविरुध्द अटक वॉरंट जारी करत येत्या 9 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचसमोर हजर करावे असे आदेश बीडच्या शिवाजीनगर पोलीसांना दिले आहेत. या प्रकरणात तक्रारदाराच्या वतीने अॅड.के.बी.सोनवणे यांनी काम पाहिले.
Leave a comment