जिल्ह्यात आज 57 नवे रुग्ण
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात आज सोमवारी (दि.2) 782 जणांची चाचणी केली गेली यात 57 नवे रुग्ण आढळून आले तर 725 निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई व आष्टी तालुक्यात प्रत्येकी 2 बीडमध्ये 23, धारुर 8, गेवराई 7, केज 1, माजलगावात 6, परळीत 4, शिरुरमध्ये 1 तर वडवणीत 3 रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.
जिल्ह्यात रविवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आता बीड जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 13 हजार 510 इतकी झाली असून 12 हजार 138 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 417 जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.आता जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र दिसू लागले आहे.असे असले तरी मृत्यूची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. सर्वात मोठा सण असलेली दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या काळात गर्दीत वाढ होते. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा घसरता आलेख कायम ठेवण्याचे आव्हान समोर आहे. गत पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे.
रुग्णांची संख्या कमी होत आहे तर व्यवहार वाढत आहेत. लोकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य कमी होत आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात स्वच्छ करणे या त्रिसुत्रीवरच दुसरी लाट थोपवणे शक्य आहे असे तत्ज्ञांचे मत आहे.2021 च्या दुसर्या तिमाहीपर्यंत भारतातील नागरिकांसाठी स्वदेशी लस उपलब्ध असेल अशी माहिती भारत बायोटेक कंपनीच्या अधिकार्याने दिली आहे. सध्या कंपनीचे लक्ष्य देशभरातील लसीची टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर आहे.
भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली. शेवटच्या टप्प्यातील चाचणीचा डेटा हा सुरक्षित आणि यशस्वीरित्या पार पडल्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2021च्या दुसर्या तिमाहीपर्यंत ही लस नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या लशीची चाचणी साधारण 14 राज्यांमध्ये 24 ते 25 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सुरू आहे. प्रत्येक रुग्णालयात जवळपास 2000 स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी सध्या सुरू आहे.
Leave a comment