नापिकी,कर्जबाजारीपणामुळे टोकाचे पाऊल
जिल्हास्तरावर 54 शेतकरी कुटूंबाना शासकीय मदत
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात 1 जानेवारी ते 21 सप्टेंबर 2019 या नऊ महिन्याच्या कालावधीत तब्बल 123 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. यातील बहुतांश आत्महत्या शेतीची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून घडल्या आहेत.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला शासनाकडून 1 लाखाची मदत दिली जाते. 123 पैकी 21 सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील 54 पात्र कुटूंबाना ही मदत वितरित झाली आहे तर आत्महत्येची 25 प्रकरणे जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत अपात्र ठरवण्यात आली असून उर्वरित 44 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. मागील नऊ महिन्यात 123 शेतकर्यांनी वेगवेगळ्या कारणावरुन आत्महत्या केल्या आहेत. प्रशासनाकडे या आत्महत्येची नोंद झाली आहे. सर्वाधिक 24 आत्महत्या यंदा लॉकडाऊनच्या कालावधीत जून महिन्यात घडल्या आहेत. चालू वर्षी जानेवारी महिन्यात 18 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यातील 17 शेतकरी कुटूंबांना शासकीय मदत देण्यात आली तर 1 प्रकरण अपात्र ठरवले गेले. फेबुवारी 2020 मध्येही 16 आत्महत्या झाल्या, त्यातील 15 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. मार्चमध्ये 19 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या, यात 14 कुटूंबांना शासकीय मदत वितरित झाली तर आत्महत्येची 5 प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत. एप्रिलमध्ये 9 आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या, पैकी 2 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. उर्वरित 7 शेतकरी आत्महत्येची प्रकरणे जिल्हा प्रशासनाकडून अपात्र ठरवण्यात आली. त्यामुळे या कुटूंबाना मदत मिळालेली नाही. मे महिन्यातही 8 आत्महत्या झाल्या. यापैकी 4 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली.
जुलै महिन्यात 10 शेतकर्यांनी जीवन संपवले.या सर्व शेतकरी कुटूंबांना शासकीय मदत वितरित केली गेली. ऑगस्टमध्येही 9 शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या. सर्व प्रकरणे मदतीसाठी मात्र ठरली. चालू 1 ते 21 सप्टेंबर या कालावधीत 10 शेतकरी आत्महत्येच्या घटना जिल्ह्यात घडल्या. या प्रकरणांची चौकशी अद्याप सुरु आहे, त्यामुळे पुढील प्रक्रिया झालेली नाही. दरम्यान नऊ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात 123 आत्महत्येच्या प्रकरणात प्रशासनाकडून 54 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरवण्यात आली. या कुटूंबाना 54 लाखांची मदत वितरित करण्यात आली आहे.
Leave a comment