प्रशासनाची रात्रंदिवस मेहनत तरीही बीडकर तोंड उघडे ठेवून फिरू लागले
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनामुळे हाहाकार निर्माण झाला आहे. दररोज दिडशेपेक्षा जास्त बाधीत रुग्ण निष्पन्न होत असतानाही बीड शहरातील व्यापार्यांसह खरेदीला येणार्या ग्राहकांनाही त्याचे काही देणे-घेणे राहिले नाही. आपल्याला कोरोना होणार नाही. अशा थाटात हे महाभाग खरेदीसाठी हमरस्त्यासह बाजारपेठेत फिरु लागले आहेत. हद्द म्हणजे दुकाने चालवणारे बहुतांश व्यापारीही स्वत:च्या तोंडावर मास्क बांधत नसल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहे. वास्तविक दुकानात येणार्या ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था व्यापार्यांनी करणे गरजेचे आहे. शिवाय तोंडाला मास्क नसणार्या ग्राहकांना बाहेरच रोखणे महत्वाचे आहे, मात्र सारे काही अलबेल असल्याच्या थाटात व्यापारी अन् ग्राहक कोरोना साथीच्या संकटातही बिनधास्त वावरत आहेत. त्यामुळे कोरोना आटोक्यात येणार तरी कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा प्रशासनानेच आता कोव्हीड 19 नियमांचे पालन न करणार्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. मास्क नसलेल्या कुठल्याही भाजीपाला विक्रेत्याकडून, किराणा दुकानदाराकडून, फळ विक्रेत्याकडून अथवा इतर कुठल्याही वस्तूची विक्री विनामास्क करणार्या विक्रेत्याकडून खरेदी करू नका. त्याच्याकडून वस्तू खरेदी केली तर कोरोनाला आमंत्रण दिल्यासारखे होईल. दिवसेंदिवस कोरोना वाढण्याचे हे एकमेव कारण आहे. हे जनतेने लक्षात घ्यायला हवे. बीड शहर आणि जिल्ह्यासाठी प्रशासन रात्रंदिवस मेहनत करत असताना बीडकर मात्र तोंड उघडे ठेवून फिरत आहेत. हे योग्य नाही त्यामुळे आगामी दोन महिने फक्त कोरोनाचे आहे हे लक्षात घेवून जनतेने काळजी घेण्याचे गरजेचे आहे. तोंडावर मास्क आणि खिशात सॅनिटायजरची बाटली ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
बीड जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत चालला आहे. मागच्या आठवडाभरापासून जिल्ह्यात दररोज दिडशे पेक्षा जास्त रुग्ण निष्पन्न होत आहेत. सुरुवातीला शहरी भागात कोरोनाचे रुग्ण सापडत होते. त्यामुळे रुग्ण सापडलेल्या भागात कंटेटमेंट झोन जाहीर केले जात होते. आता तेही बंद झाले आहे. शिवाय ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वेगाने होवू लागला आहे.
ग्रामीण भागातील लोक खरेदीच्या निमित्ताने शहरात येत आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर बाजारपेठेतही गर्दी वाढू लागली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनातून फिरणार्यांची संख्याही पूर्वीप्रमाणे झाली आहे. मात्र या सार्या स्थितीत प्रत्येक नागरिकाने आपली स्वत:ची काळजी घेवूनच घराबाहेर पडणे गरजेचे असताना बीड शहरातील सुभाष रोड, सिध्दीविनायक कॉम्पलेक्स, भाजीमंडई, जालना, रोड, साठे चौक, गॅरेज लाईन इतकेच काय खासगी हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी जाणारे रुग्णाचे नातेवाईकही तोंडावर मास्क बांधत नसल्याचे दिसून येत आहे. खरेदीसाठी आणि अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडताना कोव्हीडच्या संदर्भातील साधे नियमही नागरिक पाळेनासे झाल्याचे दिसू लागले आहे.
सुरुवातीला जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मर्यादीत असताना अन् वारंवार होणारे लॉकडाऊन या दरम्यानच्या काळात कोरोनाची प्रंचड दहशत होती, मात्र आता लॉकडाऊन उठवल्यानंतर आणि दररोज शंभरहून अधिक बाधित रुग्ण निष्पन्न होत असताना नागरिकांमध्ये कोरोनाची पहिल्यासारखी भीती उरलेली नाही, त्यामुळेच बाजारपेठेत फिरताना अनेकजण तोंडावर साधा मास्क बांधायलाही तयार नाहीत. नुकतेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीडमध्ये येवून जिल्हा यंत्रणेचा कोरोनासंदर्भात आढावा घेतला होता, तेव्हा जालना रोडवरील बाजारपेठेचे चित्र पाहूनन केंद्रेकरही अवाक झाले होते.
ना व्यापारी, ना ग्राहक कोणीही तोंडाला मास्क न बांधता चर्चा करत असल्याचे त्यांना दिसून आले होते. याबाबत त्यांनी आढावा बैठकीत नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतरही बीड शहरातील स्थिती बदललेली नाही. बाजारपेठेत फिरताना तोंडाला मास्क न बांधताच नागरिक दुकानांमध्ये गर्दी करणार असतील अन् अनोळखी लोकांशी जवळून संपर्कात येणार असतील तर कोरोनाची साथ आटोक्यात येईल तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिक आणि व्यापार्यांना शिस्त लावण्यासाठी आता थेट दंडात्मक कारवायाच सुरु कराव्यात अशा भावनाही शहरातील सजग नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
रुग्णांसाठी प्रशासन रात्रंदिवस सेवेत;
तरीही नागरिक मात्र बिनधास्त!
कोरोनाचा प्रसार रोखत नसल्याने सध्या जिल्ह्यातील रुग्णालयात रुग्णांना बेंड मिळणे अशक्य होवू लागले आहे. अनेक ठिकाणी उभारलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवावे लागत आहे. रुग्णसंख्या वाढूच नये, अन् वाढली तर त्यांना ऑक्सीजन, व्हेंटीलेटर कमी पडू नये यासाठी जिल्हा प्रशासन रात्रंदिवस एक दिलाने काम करत आहे. दुसरीकडे बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वेगाने वाढू लागली आहे. मात्र इतकी सारी गंभीर स्थिती जिल्ह्यात ओढवलेली असतानाही व्यापारी,नागरिक अन् समाजातील सर्वच घटक जर प्रशासनाला सहकार्य करणार नसतील तर हे मोठे संकट संपणार कधी? त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे अशी भावना सजग नागरिकातून व्यक्त केली जात आहे.
Leave a comment