बीड । वार्ताहर
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारपासून बीड शहरात व्यापरी, व्यावसायिकांच्या अॅन्टिजेन टेस्ट केल्या जात आहेत. शनिवारी 86 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रविवारी (दि.9) दुसर्या दिवशीही शहरात 137 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दिवसभरात एकुण 3 हजार 170 व्यापारी, व्यावसायिक, कामगार यांची तपासणी केली गेली. दरम्यान रविवारीही बीडची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. दुसर्या दिवशीही व्यापार्यांनी या चाचणीसाठी चांगला प्रतिसाद दिला.
कोरोची संसर्गसाखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेवराईत भीलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर ‘सुपर स्प्रेडर्स’ना शोधण्यासाठी अँटीजन चाचणीचा प्रयोग राबविला होता, त्यानंतर बीडमध्येही अँटीजन चाचणीचा प्रयोग राबविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला. त्यानुसार शनिवार व नंतर रविवारी सकाळपासून बीड शहरात व्यापार्यांसह त्यांच्याकडे कामाला असलेल्या नोकरांची अँटीजन चाचणी करण्यात आली. शहरातील एकुण सहा केंद्रावर दिवसभरात 3 हजार 170 व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले. यातील 137 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर व्यक्तींची तपासणी व निदान झाल्यामुळे इतर लोकांना होणारा प्रसार थांबवण्यात मदत होणार आहे. शहरातील सहा तपासणी केंद्रावर स्वॅब तपासणीकामी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,आरोग्य सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा एकुण 94 कर्मचार्यांनी काम पाहिले.
शनिवारी वाढले 203 रुग्ण
बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.8) सकाळी तपासणीला पाठवलेले एकुण 3357 स्वॅब अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले. यात बीड शहरात शनिवारी अॅन्टिजेन तपासणीतील 86 बाधिताचा समावेश होता. जिल्ह्यात एकुण 203 रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. यात बीडमधील अॅन्टिजेन तपासणीतील 86 व थ्रोट स्वॅबमधील 18 असे एकुण 104, अंबाजोगाई,आष्टी प्रत्येकी 10, धारुर 2,गेवराई 6,केज 13, माजलगाव 19,परळी 32 पाटोदा 2 आणि वडवणी तालुक्यातील 5 जणांचा बाधित रुग्णात समावेश आहे.
Leave a comment