चोरीच्या सात मोबाइलसह दुचाकी जप्त
बीड । वार्ताहर
खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशातील मोबाइल लंपास करणार्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात आले. कारवाईदरम्यान त्यांचा एक साथीदार फरार झाला. गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि.12) दुपारी शहरालगतच्या तेलगाव नाका परिसरात ही कारवाई केली. चोरट्यांकडून चोरीचे एकुण सात मोबाइल व एक दुचाकी जप्त करण्यात आली.
किरण संपतराव गुंजाळ (18) व कृष्णा उर्फ बाबु वैजिनाथ कदम (18 दोघे रा.नुर कॉलनी,गांधीनगर बीड) अशी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हे दोघे संचारबंदीच्यादरम्यान बाजाराच्या ठिकाणी मोबाइल चोरायचे. रविवारी (दि.12) दुपारी तीन तरुण एका दुचाकीवरुन (एमएच-23 एक्यू-2793) तेलगाव नाक्याकडे जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीसांनी त्यांना अडवले तेव्हा पाठीमागे बसलेला एकजण पळून गेला. किरण व कृष्णा यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीचे दोन मोबाईल आढळून आले. दरम्यान दोघांचीही सखोल चौकशी केली तेव्हा 5 एप्रिल रोजी बीडच्या शाहूनगरमधून एक मोबाइल चोरल्याची कबुली दिली; शिवाय अन्य पाच मोबाइल घरी ठेवल्याचेही सांगीतले. पथकाने आयएमईआय क्रमांकावरुन त्या मोबाइलची खात्री केली असता तो वसुदेव नवनाथ गायके (रा.आदर्शनगर,बीड) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. नंतर दोन्ही चोरट्यांच्या घरातून चोरीचे पाच व कारवाईदरम्यान सापडलेले 2 असे सात मोबाइल, एक चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा एकून 1 लाख 12 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासकामी दोघांनाही शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तुळशीराम जगताप, बालाजी दराडे, नसीर शेख, भास्कर केंद्रे, विकास वाघमारे, अन्वर शेख, संगिता सिरसट, चालक संतोष हारके यांनी ही कारवाई केली.

 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment