आष्टी : रघुनाथ कर्डीले
आष्टी तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या मांडवा गावातील अविनाश साबळे यांची 2021 मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलम्पिकमध्ये अॅथलेटिक्स गेमसाठी निवड झालेली आहे. भारतातील चार खेळाडूंपैकी हा एकमेव खेळाडू महाराष्ट्रातील आहे.कठोर मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या आयुष्याचे सोन करीत असताना महाराष्ट्राचे नाव जगाच्या पाठीवर कोरण्याचें काम अविनाश साबळे यांनी केले आहे.
आष्टी तालुक्यातील साधारणपणे १२००ते १५०० लोकसंख्या असलेलं मांडवा हे नगर - बीड राज्य महामार्गावर हायवेपासून पाच किमी अंतरावर आतमध्ये असलेलं खेडेगाव. याच गावात सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले अविनाश साबळे असून ते भारतीय सैन्यात महार बटालियन मध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
गावात शाळा नसल्यामुळे पहिलीपासून बारावीपर्यंत आष्टी येथे सहा किलोमीटर पायी चालत त्यांनी शिक्षण केले.कष्ट करण्याची तयारी व शिकण्याची आवड यामुळे शिकण्याची नाळ तुटू दिली नाही.त्याला आईवडिलांनीही साथ दिली.
बारावी उत्तीर्ण होताच वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी सैन्यात भरती झाले. भरती होताच त्याची बदली बर्फाळ भागातील सियाचीन ग्लेशियर या ठिकाणी झाली. सियाचीन मध्ये सहा महिने काम केल्यानंतर राजस्थान मध्ये हि त्याने आपली कर्तव्ये पार पाडली.
राजस्थानमधुन दोन वर्षानंतर अविनाश ची सिक्कीम मध्ये बदली झाल्यानंतर तिथे 2015 मध्ये इंटर आर्मी स्पर्धेत सहभाग घेऊन क्रॉस कंट्री मध्ये ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.त्यांनी स्टीपलचेज या खेळासाठी अमरीश कुमार यांचे मार्गदर्शन घेतले त्याने घेतले.यासाठी त्याला जवळपास 20 किलो वजन कमी करायचे होते व अवघ्या 3 महिन्यांत त्याने ते केले.3000 मिटर धावण्याच्या (हार्डल जंप, वॉटर जंप ) अशा स्टीप्लचेज गेममध्ये सहभाग घेऊन दोहा एशियन गेम्समध्ये 37 वर्षांचा राष्ट्रीय विक्रम अविनाशने तोडला.महार रेजिमेंट मधील हवालदार असणारा अविनाश साबळे आता ऑलम्पिक मध्ये भारताचे नेतृत्व करणार असल्याने तालुक्यासह बीड जिल्ह्याचा जगात आवाज वाढणार आहे.
Leave a comment