चकलांब्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील प्रकार
गेवराई । वार्ताहर
शेतकर्यांना पिककर्ज द्यावे यासाठी प्रशासनाने पंधरा दिवस वारंवार सुचना केल्यानंतर आणि सरकारने वरून तंबी दिल्यानंतर कर्जमाफीतील पात्र लाभार्थ्यांना आणि इतर शेतकर्यांना पिककर्ज देण्याचे औदार्य बँकांनी दाखवले. मात्र हे पिककर्ज देताना जणू शेतकरी चोर आहेत अशा भावनेनेच बँकेतील अधिकारी शेतकर्यांना पिककर्ज देण्याची प्रक्रिया करत आहेत. चकलांब्यात तर पिककर्ज मागण्यासाठी गेलेल्या शेतकर्याला अक्षरश: धुकाडवून लावत हाकलून दिले. त्यामुळे चकलांब्यातील शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून शाखेचे व्यवस्थापक नवगिरे यांना येथून बदलावे अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराच शेतकर्यांनी दिला आहे.
सध्या जिल्हाभरामध्ये जोरदार पावसाचे आगमन झालेले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी आदि पिकांची पेरणी केलेली आहे. हे करण्यासठी आणि खते, किटकनाशके घेण्यासाठी शेतकर्यांना पिककर्जाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील अधिकार्यांनी काही शेतकर्यांचे जुने कर्ज नवे केले. कर्जमाफीतील शेतकर्यांना कर्ज देण्यासाठी मात्र सातत्याने टाळाटाळ होत आहे. ज्या शेतकर्यांना पिककर्ज देण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली त्या शेतकर्यांची वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी अडवणूक केली जात आहे. साध्या साध्या कामासाठी दोन दोन दिवस प्रक्रिया प्रलंबीत ठेवली जात आहे. गेवराई तालुक्यातील बहुतेक शाखांमधून असाच अनुभव शेतकर्यांना आला आहे. दोन दिवसापूर्वी कर्ज मागण्यासाठी गेलेल्या एका शेतकर्याला बँकेतील अधिकार्यांनी धुडकावत हाकलून लावले. बँकेतील तीन चार कर्मचारी या शेतकर्याच्या अंगावर धावून गेल्याने त्याला बाहेर काढले. ज्यावेळी इतर शेतकर्यांनी आवाज वाढवला तेव्हा कुठे बँकेचे अधिकारी शांत झाले. येथील बँकेचे शाखाव्यवस्थापक नवगिरे यांनी वारंवार शेतकर्यांचा अपमान केलेला आहे. तरीही रोजच बँकेच्या दारात जायचे, जावुद्या कशाला? असे म्हणत शेतकर्यांनी अनेकवेळा याकडे दुर्लक्ष केलेले आहे. मात्र वारंवार शेतकर्यांचा अपमान करणार्या नवगिरे संदर्भात आता चकलांब्यात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात काही शेतकर्यांनी लिड बँकेचे अधिकार्यांकडे त्यानंतर तहसिलदारांकडेदेखील तक्रार केली आहे. मात्र दोघांनीही साधा दुरध्वनीदेखील नवगिरे यांना केला नाही. नवगिरे यांची चकलांब्यातून उचलबांगडी केली नाही तर शेतकरी बँकेला कुलूप ठोकतील असा इशाराही काही शेतकर्यांनी दिला आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालून चकलांब्यातील पात्र शेतकर्यांच्या पिककर्जाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली जात आहे.
Leave a comment