गावकर्यांनी पुष्पवृष्टी करून केले स्वागत
चौसाळा । वार्ताहर
बीड तालूक्यातील चौसाळा येथे कोरोना पॉझिटिव्हचे चार रुग्ण आढळून आले होते. त्या चारही रुग्णांनी कोरोनाच्या आजाराला हरवून त्यावर मात केली असून (ता. 21) मंगळवार रोजी त्या चारही रुग्णांना डिचार्ज मिळाला आहे. कोरोनावर मात करून आलेल्या त्या चारही रुग्णांवर गावकर्यांनी पुष्पवृष्टी करत गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी त्यांना घरी सोडण्यासाठी आलेल्या रूग्णवाहीकेच्या चालकाचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
विशेष बाब म्हणजे चौसाळ्यात कोरोना विषाणूची लागण झालेला 43 वर्षीय रुग्ण प्रथमच आढळुन आलेला होता. त्यानंतर त्या रुग्णाची पत्नी व मुलगा आणि गावातील 35 वर्षीय तरुणाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता.चौसाळ्यात प्रथम कोरोनाचा रुग्ण सापडल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले होते.परंतु स्वतः पत्नी व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असताना त्या 43 वर्षीय रुग्णाने रुग्णालयातून गावकर्यांशी संपर्क साधत तर कधी व्हिडिओ कॉल करून चौसाळकरांमधील भिती दूर करण्याचे काम केले. आज त्यांना डिचार्ज मिळाल्यानंतर गावकर्यांनी पुष्पवृष्टी करत गुलाब पुष्प देत स्वागत केले. यावेळी सरपंच मधुकर तोडकर,जयहिंद गणेश मंडळाचे कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. यावेळी सामाजिक आंतर राखत त्यांचे स्वागत करण्यात आले.
Leave a comment