बीड जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट
बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यातील तीन रुग्णांचा मृत्यू झालेला असतानाच आता आज मंगळवारी (दि.21)सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक अधिपरिचारिकेसह वृद्ध रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोव्हीड योध्दा अधिपरिचारिका यांचा काल रात्रीच कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता.
बीड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. आज मंगळवारी सकाळी बीड जिल्हा रुग्णालयातील ४० वर्षीय अधिपरिचारिका यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबरोबरच बीड येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्ण औरंगाबाद येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. आज मंगळवारी पहाटे त्यांना वेंटीलेटरवर बीड येथे आणण्यात आले होते. ते मृत अवस्थेत जिल्हा रुग्णालयात पोहचले. एकाच दिवशी दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान उपचार घेणाऱ्या गेवराई येथील ६५ वर्षीय महिलेची प्रकृती अत्यावस्थ आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 19 झाली आहे.मागील तीन दिवसात तब्बल 7 रुग्ण दगावल्याने कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान जिल्ह्यासमोर आहे.
Leave a comment