बीडमध्ये रुग्णालयातील बाधिताच्या संपर्कातील 10 तर
केज गेवराईत प्रत्येकी 2 परळीतील एकाचा समावेश
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढतच चालला आहे.आज गुरुवारी (दि.16) एकुण 15 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्वॅब रिपोर्टवरुन स्पष्ट झाले. यातील 7 महिला व 3 पुरुष असे 10 रुग्ण बीडमधील एका खासगी रुग्णालयातील पॉझिटिव्ह रुग्णाचे सहवासित आहेत. तर केज तालुक्यातील नांदूरघाट येथे 2 तर गेवराईतील माऊलीनगर व मोटेगल्ली येथील 2 आणि परळीतील सर्वेश्वरनगर येथील 1 पुरुष रुग्णाचा समावेश आहे.जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
बाधीत रुग्णांमध्ये बीड येथील एका खासगी रुग्णालयातील पॉझिटिव्ह रुग्णाचे सहवासित असलेले 22, 24 व 22 वर्षीय पुरुष तसेच 22,27,31,26,30,48 व 28 वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय केज तालुक्यातील नांदुरघाट येथील 51 वर्षीय महिला व 14 वर्षीय मुलगा, तर गेवराईच्या माऊलीनगर येथील 60 वर्षीय महिला आणि मोटेगल्लीतील 64 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णावर सध्या औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. तसेच परळी शहरातील सर्वेश्वर नगर येथील 48 वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे.
125 रुग्णांवर उपचार सुरु;आठवडाभरात सापडले 86 रुग्ण
बीड जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 280 इतकी झाली असून यातील 143 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत तर 12 जणांचा मृत्यू झालेला आहे.आता जिल्ह्यात 125 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान जिल्ह्यात गत सात दिवसात तब्बल 86 नवीन रुग्ण वाढले आहेत.
नांदूरघाट येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह
केज तालुक्यातील नांदूरघाट येथी दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस झाले आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 51 वर्षीय महिला आणि 14 वर्षीय पुरुष असे हे दोन रुग्ण आहेत. दरम्यान या व्यक्तींच्या संपर्कामध्ये कोण कोण आले आहेत याची देखील माहिती मिळवणे चालू आहे. पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत नांदूर घाट यांनी घराच्या बाहेर न पडण्याचे आदेश देखील दिले आहेत.आतापर्यंतच्या कोरोनाच्या महामारीमध्ये नांदूरघाटमध्ये रुग्ण आढळून आलेले नव्हते. पहिल्यांदाच बाधित रुग्ण सापडले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
Leave a comment