प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट
चौसाळा । वार्ताहर
चौसाळा शहरात प्रथमच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ कैलास खाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. तसेच कोरोनाच्या पुढील प्रसारास आळा बसावा म्हणून उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या.
चौसाळा व जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात पहिल्या तीन महिन्यात जसा संयम बाळगला त्याप्रमाणे संयम बाळगावा तसेच शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. तसेच चौसाळा येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने संपूर्ण चौसाळा शहर लॉकडाऊन करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी या बाबीवर चिंता व्यक्त केली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे, सदरील कोरोना बाधिताच्या संपर्कात आले असल्यास स्वतःहून त्याची माहिती प्रशासनाला द्यावी, आवश्यकतेनुसार त्यांची तपासणी व स्वॅब टेस्ट केली जाईल, जेणेकरून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत होईल.
तसेच वरचे वर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, कोरोनासंबंधित कोणतेही लक्षणे आढळल्यास ती माहिती प्रशासनास तात्काळ कळवावी, चौसाळा शहर कंटेन्मेंट झोन मध्ये असल्याने जिल्हा परिषद गटातील इतर गावांतील नागरिकांनी सध्याच्या परिस्थितीत चौसाळा शहरात प्रवेश टाळावा तसेच चौसाळ्यासह जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कटाक्षाने पालन करावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी केले आहे.
Leave a comment