बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात पुन्हा 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. परळी तालुक्यातील एसबीआयच्या 4 ग्राहकांसह अंबाजोगाई येथील एका महिलेचा बाधीत रुग्णात समावेश आहे.
परळी तालुक्यातील ब्रह्मवाडी पो. टोकवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, विद्यानगर परळी येथील 39 वर्षीय पुरुष, इंद्रनगर परळी येथील 75 वर्षीय पुरुष, न्यू पेठ मोहल्ला, परळी येथील 44 वर्षीय पुरुष या 4 एसबीआय ग्राहकांना कोरोनाची लागण झाली आहे तर अंबाजोगाई येथील सिराज कॉलनीतील 36 वर्षीय महिलेचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
शनिवारी (दि.11) बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 717 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी 286 स्वॅबचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते तर 431 अहवाल प्रलंबित होते. रविवारी सायंकाळी एकूण 345 अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले.यातील 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अन्य 340 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर शनिवार व रविवारचे एकूण 628 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
आजपर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू
बीड जिल्ह्यात मागील 3 दिवसात तब्बल 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाची धास्ती वाढली आहे. शुक्रवारी येवलवाडी (ता.पाटोदा) येथील 1 व शनिवारी बेनसूर (ता.पाटोदा) येथील 1 रुग्णाचा पुणे येथे तर उमापूर (ता.गेवराई) येथील एका रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास बीड शहरातील किला मैदान परिसरातील 75 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.दरम्यान यातील येवलवाडी,बेनसूर व उमापूरच्या रुग्णांना अगोदरच कॅन्सर, न्यूमोनिया व इतर आजार होते. त्यात कोरोनाची भर पडली होत. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे.
95 रुग्णांवर उपचार सुरू
आता बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 227 झाली असून यापैकी 121 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे. सद्यस्थितीत 95 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Leave a comment