चौसाळा शहर कडकडीत बंद; बीडमध्ये तीन ठिकाणी नव्याने कंटेटमेंट
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात शनिवारी सकाळपर्यंत तब्बल 20 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. दरम्यान यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बीड शहरातील तुळजाई नगर, संत तुकाराम नगरसह शाहूनगर या तीन भागांसह जिल्ह्यातील आष्टीतील दत्त मंदिर गल्ली, चौसाळा शहर, गेवराईतील मोमीनपुरा,पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी तसेच अंमळनेर पोलीस स्टेशनसह परिसर,धारुर शहरातील साठेनगर या भागात पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
आष्टी शहरातील दत्तमंदिर गल्ली येथे कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळुन आल्याने आष्टी येथील दत्तमंदिर गल्ली ते साई मंदिर, तसेच साई मंदिर ते कालिका मंदिर पर्यंतच्या परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. याशिवाय बीड शहरातील शाहुनगर येथील आश्विनी हॉटेल ते विष्णू जाधव यांचे साईप्रसाद भोजनालयपर्यंतचा परिसर कंटेटमेंट झोन जाहीर झाला आहे. तसेच बीड शहरातील तुळजाई नगर येथील बाळकृष्ण थोरात, यांचे घर ते गोविंद हंगे यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेटमेंट झोन घोषित झाला आहे. बीडमधील संत तुकारामनगर येथील सुभाष वाघ यांच्या रिकाम्या भुखंडापासून सुभाष आधापुरे यांच्या घरापर्यंतचा परिसरही बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.बीड तालुक्यातील चौसाळा येथेही एक बाधित रुग्ण निष्पन्न झाल्याने संपूर्ण चौसाळा गाव बंद करण्यात आले असून आज चौसाळ्यात व्यापार्यासंह नागरिकांनी कडकडीत बंद पाळला आहे.गेवराईतील मोमीनपूरा भागात 2 रुग्ण आढळून आल्याने मोमीनपूरा परिसर पूर्णवेळ बंद केला गेला आहे.याशिवाय गत दोन वर्षापासून पिंपळवंडी (ता.पाटोदा) येथे वास्तव्यास असलेला व मूळ गाव संत तुकारामनगर (बीड) येथील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने पिंपळवंडी,अंमळनेर पोलीस ठाण्यासहचा परिसर कंटेटमेंट झोन घोषीत करण्यात आला आहे.तसेच धारुर शहरातील साठेनगर येथे एक बाधित रुग्ण निष्पन्न झाल्याने शहरातील धर्मराज वैरागे यांचे घर ते आश्रुबा मार्कंड यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेटमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
Leave a comment