महारटाकळी चेकपोस्टवरील भरदिवसाची घटना
बीड-धोंडराई । वार्ताहर
पोलीसांनी थांबण्याचा इशारा करुनही भरधाव जाणार्या टेम्पो चालकाने बंदोबस्तावरील पोलीसांच्या अंगावर टेम्पो घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गेवराई तालुक्यातील महारटाकळी पोलीस चेकपोस्टवर गुरुवारी (दि.9) दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. चालकाविरुध्द चकलांबा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अर्जुन निवृत्ती बडे (45, रा.चैतन्यनगर, संगमनेर जि.अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.कोरोनाच्या अनुषंगाने पोलीस दलाने बीड जिल्ह्याच्या सीमेवर सर्व बाजूंनी नाकाबंदी चेकपोस्ट स्थापन केले आहेत. गुरुवारी दुपारी चकलांबा ठाण्यात नेमणूकीला असलेले पोलीस कर्मचारी किशोर खेत्रे व पोलीसांसह अन्य कर्मचारी हे चकलांबा ठाणे हद्दीतील महारटाकळी चेकपोस्टवर नाकाबंदी बंदोबस्तकामी होते. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आयशर टेम्पो क्र. (एम.एच.17 एजी 2351) भरधाव येत होता. खेत्रे यांनी चालकास हात करुन टेम्पो थांबवण्याचा इशारा केला;मात्र चालकाने थेट पोलीसांच्या अंगावर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.वेळीच पोलीस कर्मचारी बाजूला सरकले, त्यामुळे भरधाव टेम्पोने चेकपोस्टचे लोखंडी बॅरिकेट आणि तीन खुर्च्याला धडक देवून नुकसान करत पळून जाण्याचा प्रयत्न करत शासकीय कामात अडथळा आणला.पो.शि.किशोर खेत्रे यांच्या फिर्यादीवरुन टेम्पो चालकावर जिवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.सहाय्यक निरीक्षक विजय देशमुख पुढील तपास करत आहेत.
Leave a comment