लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढला; मास्क वापरणे बंधनकारक
बीड । वार्ताहर
केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनचे अनलॉकमध्ये रूपांतर करत टप्याटप्याने सर्वच व्यवहार सुरू केले आहेत. केवळ मंदिरे, पानटपर्या, हॉटेल, शाळा आणि मंगल कार्यालये बंद आहेत. रूग्ण वाढू लागले, तसेच सर्व व्यवहार सुरू केले आहेत. जेव्हा रूग्ण नव्हते तेव्हा बीडमध्ये कडक लॉकडाऊन होते, मात्र आता सर्व काही शिथील झाले आहे आणि रूग्ण वाढू लागले आहेत. शेजारी असलेल्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबादचे तर कोरोना शहर म्हणूनच ओळख निर्माण झाली आहे. बीडकरांनी काळजी घेतली नाही आणि विनाकारण परस्परांच्या संपर्कात येत राहिले तर बीडचेही जालना किंवा औरंगाबाद व्हायला वेळ लागणार नाही. आता प्रशासन मग ते महसूल असो की पोलिस दोन्हीही प्रशासन त्यांच्या कामाला लागले आहेत. केवळ यंत्रणा आहे हे दाखवण्यासाठी पोलिस संध्याकाळी सात वाजता रस्त्यावरून फिरतात, नगरपालिकेची यंत्रणा सुस्त झाली आहे. मास्क लावा किंवा लाऊ नका, सोशल डिस्टन्स पाळा अथवा पाळू नका, प्रशासकीय यंत्रणेला कशाचेही देणे घेणे राहिले नाही. त्यामुळे बीडकरांनीच आता काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातच पुन्हा आता सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे त्या स्थितीत कायम ठेवले आहे. केवळ जिल्हाबंदी सोडली तर बाकी सर्व काही सुरू आहे. नागरिकांनी कोरोना संसर्ग झाल्यावर तोंड कसे द्यायचे हे शासनाने शिकवले आहे. आता सर्व काही नागरिकांवर आहे त्यामुळे नागरिकांनीच दक्ष राहणे गरजेचे आहे.
राज्य सरकारने काल पुन्हा लॉकडाऊन वाढवला आहे. 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन चालू राहणार असून यामध्ये सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि वाहतुकीच्यावेळी चेहर्यावर मास्क घालणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर राखणे सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक आहे. दुकानात गेल्यानंतर ग्राहकांमध्ये योग्य अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. एकाचवेळी पाचपेक्षा जास्त लोकांना परवानगी देऊ नये. मोठया संख्येने लोकांना एकत्र जमता येणार नाही. लग्नसमारंभाला परवानगी आहे. पण पाहुण्यांची संख्या 50 पेक्षा जास्त नसावी. अंत्यविधीच्यावेळी सुद्धा 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान आणि तंबाखू खायला मनाई आहे. कामाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर व बाहेर निघण्याच्या मार्गावर थर्मल स्क्रिनिंग करावे लागेल तसेच हँड वॉश, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे. कामावर मानवी संपर्क येणार्या प्रत्येक ठिकाणाची सतत स्वच्छता करावी लागेल. कर्मचार्यांच्या शिफ्टच्या वेळा तसेच कामावर असताना कर्मचार्यांमध्ये योग्य अंतर ठेवण्याची जबाबदारी प्रमुखाची असेल. 31 मे आणि चार जून 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार बिगर जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील.
लॉकडाउन की अनलॉक या संभ्रमात सरकार-मनसेची टिका
राज्यात लॉकडाउन आहे की अनलॉक सुरु झालाय? या संभ्रमात ठाकरे सरकार आहे अशी टीका मनसे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. सरकारच्या या धरसोड वृत्तीमुळे लोकांना अकारण हाल सहन करावे लागत आहेत असंही सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे की, 29 जून रोजी लॉकडाउन सुरु होउन जवळपास सव्वातीन महिने पूर्ण झाले. आता 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाउन सुरु करताना जी संभ्रमावस्था निर्माण केली गेली आहे. सरकारने आधी स्वतःशी ठरवलं पाहिजे की लॉकडाउन अधिक कडक करायचा की अनलॉक सुरु करायचं. जे निर्णय घेतले आणि बदलले जात आहेत त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. मागच्या तीन महिन्यात अनेक लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. अनेकांना तीन महिने पगार मिळालेला नाही. त्या विवंचनेत त्यांच्या गाड्या जप्त झाल्या तर लोकांनी काय करायचं? सरकारला असे काही निर्णय घ्यायचे असतील तर तीन ते चार दिवस आधी त्याला प्रसिद्धी द्यावी अशीही मागणी सरदेसाई यांनी केली आहे.
पंतप्रधान साधणार संवाद
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4 वाजता देशाला संबोधीत करणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा नव्याने काय बोलतात? याकडे देशवासियांचे लक्ष असणार आहे.
राज्य सरकारची लढाई कमकुवत-फडणवीस
मुंबई व काही प्रमाणात पुणे वगळता राज्यातील इतर महापालिकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. करोनाच्या पाश्र्वाभूमीवर राज्य सरकारकडून महापालिकांना अजूनही आर्थिक मदत नाही, हे दुर्दैवी आहे. यातून करोनाविरूद्धची लढाई कमकुवत होत आहे. असा आरोप माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला. अनलॉक 2 म्हणजे काय ते त्याचा सुस्पष्ट खुलासा झालाच पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Leave a comment