केज तालुक्यातील नांदूरघाटची घटना;शेतकरी आक्रमक
नांदूरघाट । वार्ताहर
पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने नांदूरघाट (ता.केज) येथील एका वृध्द शेतकर्याने कृषी सेवा केंद्रासमोरच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.आज रविवारी (दि.28) नांदूरघाट येथे हा प्रकार घडला. यामुळे शेतकरी किती हतबल झाला आहे याचे ज्वलंत उदाहरण समोर आले आहे.
लालासाहेब दादाराव तांदळे (65 रा.फकराबाद ता.वाशी जि.उस्मानाबाद) असे या शेतकर्याचे नाव आहे. लालासाहेब तांदळे यांनी स्वतःच्या शेतामध्ये पत्नीचे मंगळसूत्र मोडून ग्रीन गोल्ड 3344 व 335 नावाचे सोयाबीनचे बियाणे स्वतःच्या शेतामध्ये पेरले होते. पेरणी केल्यानंतर तक्रारीदेखील केल्या होत्या, परंतु कसल्याही प्रकारची मदत मिळत नसल्यामुळे कृषी सेवा केंद्रासमोर जावून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी अन्य एका शेतकर्याने त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला.या प्रकारानंतर दोनशेहून अधिक शेतकर्यांनी दुकानासमोर गर्दी केली. माहिती मिळाल्यानंतर केज ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मिसळे यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी ढापे यांनी मध्यस्थी करत शेतकर्यांची समजूत घातली; परंतु शेतकर्यांच्या भावना संतप्त होत्या. जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकर्यांना मदत करावा अशी मागणी केली.
बीड जिल्ह्यात यंदा वेळेवर पेरणीयोग्य पाऊस झाला.त्यामुळे शेतर्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांची लवकर पेरणी केली. मात्र काही ठिकाणी सोयाबीनचे पेरलेले बियाणे आठ-दहा दिवसानंतरही उगवलेच नाहीत, त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान या गंभीर प्रकाराची स्वत: कृषीमंत्री दादा भुसे यांनी दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एकीकडे नुकसानीचे पंचनामे सुरु झालेले असतानाच आता शेतकर्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने शेतकर्यांची मानसिकता किती नाजूक झाली आहे याची प्रचिती आली आहे. कृषी विभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
शेतकर्यांचे दु:ख जाणा
जिल्ह्यात सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. दुबार पेरणीची वेळ आल्याने शिवाय दुसरीकडे कोरोनाचे संकट त्यात हाती नसलेला पैसा यामुळे शेतकरी राजा प्रचंड नैराश्यात आला आहे. नांदूरघाटची ही घटना त्याचेच प्रतिक असल्याची चर्चा ग्रामीण भागात होत आहे.पेरलेले बियाणे उगवले नाही. त्यामुळे करायचे काय? शिवाय दुबार पेरणीसाठी बियाणे आणि खत आणायला पैसा आणायचा कुठून, ऊसणनवार अन् कर्ज घ्यायचे तरी कोठून असे अनेक प्रश्न शेतकर्यांना छळत आहेत.
Leave a comment