कारवाईच्या नावाखाली जखमी तरुणाकडूनच
उकळले पैसे;डिवायएसपींकडे लेखी तक्रार
कोळगाव । आबासाहेब करांडे
गेवराई तालुक्यातील बोरी-पिंपळगाव येथील एका तरुणाला गावातीलच एका जणाने तांबी व पान्ह्याने जबर मारहाण केली. यामध्ये सदरील तरुणाच्या डोक्याला व हाताला मोठी इजा होऊन गंभीर जखमी झाला असताना देखील चकलांबा पोलिस आरोपींची पाठराखण करत असून आरोपी मोकाट आहे. तसेच कारवाईच्या नावाखाली गंभीर जखमी तरुणाकडूनच चकलांबा ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विजय देशमुख यांनी पैसे उकळले असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.
बोरी-पिंपळगाव येथील अण्णासाहेब मोटे (25) यांचे उमापूर याठिकाणी दुचाकी गॅरेजचे दुकान आहे. दरम्यान मंगळवारी (दि.16) रोजी गावातीलच दिपक वडघणे हा उमापूर येथील गॅरेजमध्या आला होता. यावेळी अण्णासाहेब मोटे यांनी दुचाकी दुरुस्तीचे राहिलेली रक्कमची मागणी वडघणेकडे केली असता त्याला रक्कम मागितल्याचा राग आला. यानंतर त्याने रागाच्या भरात तुझे पैसे मला द्यायचे नाहीत, तू वारंवार पैसे का मागतोस म्हणून गॅरेजमधील तांबी व पान्ह्याने आण्णासाहेब मोटे याला जबर मारहाण केली. यामध्ये अण्णासाहेबच्या डोक्यात व हाताला गंभीर इजा झाली. यानंतर आण्णासाहेब हा उपापूर पोलिस चौकीत फिर्याद देण्यास गेला असता त्याठिकाणी उपस्थित विजय देशमुख यांनी आरोपीवर कठोर कारवाई करतो म्हणून दहा हजारांची मागणी केली. दहा हजार रक्कम दिल्यानंतर फिर्याद दाखल करुन घेतली. मात्र घटना होऊन पाच-सहा दिवसाचा कालावधी लोटला असताना देखील फिर्याद प्रत फिर्यादीस देण्यास पोलिस टाळाटाळ करत आहेत. तसेच आरोपीशी हातमिळवणी करुन आरोपीला मोकाट सोडल्याने सोमवारी सदरील आरोपी दिपक वडघणे याने जखमी तरुण अण्णासाहेब मोटे याला गावात फिरु देणार नाही, तू माझ्यावर केस का केली, पोलिस माझे काही वाकडे करु शकत नाही म्हणून अश्शील भाषेत शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे मी भयभीत झालो असून माझ्या जिवितास काही धोका झाल्यास यास आरोपी दिपक वडघणे व आरोपीची पाठराखण करणारे सपोनि विजय देशमुख हे दोघे जबाबदार राहतील असे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जात अण्णासाहेब मोटे यांनी म्हटले आहे. उपअधीक्षक स्वप्नील राठोड याप्रकरणी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. तर चकलांबाचे सपोनि विजय देशमुख यांच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे प्राप्त असताना देखील कुठलीच कारवाई होत नसल्याने त्यांना कोणाचा वरदहस्त आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माहिती घेऊन कारवाई करणार
जखमी तरुणाने कार्यालयात येऊन तक्रार दिली आहे. यानंतर लगेच संबंधीत अधिकार्यांना याप्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तक्रारीत म्हटल्याप्रमाणे चौकशी करुन कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी दिली.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment