पाटोदा। वार्ताहर
जामखेडपासून सात किलोमीटर अंतरावर सौताडा घाटामध्ये अंबाजोगाई येथुन जामखेडकडे येत असताना साखरेने भरलेले ट्रक वळणावर पलटी होऊन त्यामध्ये एक जणांना जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाले आहेत. शनिवारी (दि.20) रात्री हा अपघात घडला.
लायक शब्बीर पठाण (43, रा.ममदापूर ता.अंबाजोगाई) असे मयत ट्रक चालकाचे नाव आहे तर अशोक तोरडमल (24, रा.ममदापूर ता.अंबाजोगाई) हा क्लिनर जखमी झाला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापुर साखर कारखान्यातून साखरेचे पोते घेवून हा ट्रक क्र. (एम.एच.44-8955) पनवेल येथील टेककेअर एअर हाऊसला चालला होता. सौताडा घाटामध्ये रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी घाटात दहा फुट खोल खड्ड्यात पलटी झाली. यावेळी क्लिनर बाजूला पडल्यामुळे तो वाचला तर चालक स्टेअरिंगमध्ये अडकल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आणि त्यांचे बंधू सुनील कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धावले. त्यांनी जामखेड ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर पाटील आणि तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना घटनेची माहिती दिली. नंतर पोलीस कर्मचारी बाबासाहेब बडे आणि यांच्या सहकार्यांच्या मदतीने मृतदेह ट्रकच्या आतील काही पार्ट तोडून बाहेर काढण्यात आला आहे. यावेळी महेश मोहोळकर ,वैभव म्हेञे, असलम शेख दत्ता वाराट आदींनी मदत केली. पंचनामा करून नंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
Leave a comment