स्व.काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकास आदरांजली
आष्टी । वार्ताहर
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत परंतु हे आरक्षण मिळण्यासाठी कायगाव येथील काकासाहेब शिंदे या युवकाने बलिदान दिले आहे नुकत्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये मराठा समाजाच्या तब्बल 128 जणांची निवड झाली आहे यामुळे आष्टी तालुक्यातील तरुणांनी कायगाव (गंगापूर जि. औरंगाबाद) येथे जाऊन स्व.काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकावर जाऊन आदरांजली वाहिली.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात यावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.जुने गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील गोदावरी नदीत 23 जुलै 2018 रोजी काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणासाठी घोषणाबाजी करत पुलाच्या मध्यभागी येऊन गोदावरी नदीत उडी घेतली होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.
गुणवत्ता आहे परंतु आरक्षण नाही. आरक्षण नसल्याने शिक्षणात आणि नोकरीत संधी नाही. गुणवत्ता असूनही फक्त आरक्षणा अभावी शिक्षणात आणि नोकरीत संधी नसल्याने राज्यातील मराठा समाज विवंचनेत अडकला होता. राज्यातील मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी ‘एक मराठा, लाख मराठा’ची हाक देऊन मूक मोर्चाला सुरुवात केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. 19) जाहीर झाला. या परीक्षेत मराठा समाजाने तब्बल 128 जण आरक्षणाचा लाभ घेऊन अधिकारी झाले आहेत. एक मराठा, लाख मराठा’ हाक ठरली भारी, समाजातील 128 जण झाले अधिकारी असेच सुखद चित्र आज राज्यभर दिसत आहे परंतु यासाठी कायगाव येथील काकासाहेब शिंदे यांनी बलिदान दिले आहे तर समाजातील लाखो युवकावर गुन्हे दाखल झाले आहे आरक्षणामुळे समाजातील अनेक जणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यातील संदीप खाकाळ, दीपक सोनवणे ,संतोष मेहत्रे ,अंकुश देशमुख अनिल शिंदे ,बाळू खाकाळ यांच्यासह अनेक युवकांनी स्वर्गीय शिंदे यांच्या कायगाव येथील स्मारकावर जाऊन आदरांजली अर्पण केली आहे.
Leave a comment