बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्याला शनिवारी (दि.20) मोठा धक्का बसला आहे. एकाचदिवशी कोरोनाचे 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यात बीडच्या बशीरगंजमध्ये 4 जण, झमझम कॉलनीत 2 तर शहेनशहानगरमध्ये 1 तसेच चिंचपूर (ता.धारुर) येथे 2 जणांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातून शनिवारी सकाळी 77 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.यातील 68 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
बाधित रुग्णांमध्ये बीडच्या झमझम कॉलनीतील 21 वर्षे पुरूष व 22 वर्षे महिला, शहेनशहा नगर येथील 26 वर्षीय महिला, तसेच बशीरगंज भागातील 40 वर्षे पुरूष, 34 वर्षे स्त्री, 10 वर्षे मुलगा, 7 वर्षे मुलगा व औरंगाबाद येथून परतलेल्या चिंचपूर (ता.धारुर) येथील 31 वर्षे महिला आणि 8 वर्षीय मुलाचा समावेश आहे.
शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 21, कोव्हीड केअर सेंटर बीड 40, आष्टी ग्रामीण रुग्णालय 1, केज उपजिल्हा रुग्णालय 8, परळी उपजिल्हा रुग्णालय परळी 3, माजलगाव ग्रामीण रुग्णालय 1 आणि अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातून 2 व अन्य एक अशा एकुण 77 जणांचे स्वॅब अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील 68 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शिवाय यातील 7 जण बीड शहरातील असल्याने बीडमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पाच जण कोरोनामुक्त
दरम्यान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक, वाहन चालक व इतर पाच जण मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. पैकी चालक व सहायकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच बीड शहरातील मसरत नगर भागातील तिघांना डिस्चार्ज मिळाला आहे. आता जिल्ह्यात शनिवारपर्यंत एकूण 101 बाधितांपैकी 77 जण कोरोनामुक्त झालेले आहेत तर 4 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 26 जणांवर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत.
Leave a comment