जि.प. गटनेते अजय मुंडे यांच्या तात्काळ स्थळपाहणीच्या सूचना
परळी । वार्ताहर
शेतकर्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त होताच जि.प.गटनेते अजय मुंडे यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीची बैठक पंचायत समिती येथे संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील बाधित शेतकर्यांची तक्रार स्वीकारून सोयाबीन पिक पेरणीची स्थळ पाहणी करावी, अशा सुचना मुंडे यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.सोयाबीन बियाणे कंपनीने तालुक्यातील शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे देऊन फसवणूक केली आहे वेळप्रसंगी शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकर्यांसोबत ग्राहक मंचात जाणार असल्याचेही मुंडे म्हणाले.
यावेळी बैठकीस सभापती बबन गित्ते, उपसभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे पंचायत समिती सदस्य माऊली मुंडे कृषी अधिकारी सोनवणे, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, मंडळ अधिकारी कांदे, विस्तार अधिकारी बाबळे, कृषी अधिकारी के.टी. मोरे, कृषी मंडळ अधिकारी एस. एस. गादेकर, मंडळ अधिकारी एम.बी कवडे, जाधवर, कसारवाडीचे बंडू गुट्टे, विलास मुंडे, मांडवा ग्राप. सदस्य मोहन साखरे आदी उपस्थित होते. यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामात वेळेवर पेरणी केली आहे. शेतकर्यांनी ग्रीन गोल्ड 3344, महाबीज, जे.एस 335 कृषिधन के.एस. 441, कृषी संजीवनी 1208, संकल्प आदी वानाचे सोयाबीन बियाणे पेरले; पण ते उगवले नसल्याच्या तालुक्यातील 17 गावातील 52 शेतकर्यांनी लेखी तक्रारी तालुकास्तरीय बियाणे तक्रार समितीचे सदस्य, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दाखल केल्या आहेत. संबधित तक्ररीवरून तात्काळ शेतकर्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष स्थळ पहाणी करावी व तक्रारीचा निपटारा करण्यात यावा. तालुक्यातील बाधित प्रत्येक शेतकर्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देऊन सदैव शेतकर्यांसोबत आम्ही आहोत असेही मुंडे म्हणाले.
Leave a comment