दैव बलवत्तर म्हणून तीन प्रवाशी सुखरुप
आष्टी : रघुनाथ कर्डीले
तालुक्यातुन जाणार्या अमरापूर-बारामती राज्य महामार्गावर देविनिमगाव जवळ रस्त्याच्या कडेला असणार्या पन्नास फूट विहिरीत जीप कोसळली. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीपमधील तीन प्रवाशी सुखरूप आहेत. जीपची लाईट अचानक बंद पडल्याने चालकाला रस्ता लक्षात आला नाही, तितक्याच जीप विहिरीत कोसळली. ही घटना शुक्रवारी (दि.12) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
करण राजू पवार, नितीन अशोक गुंड, बालू शहादेव गुंड ( रा.वाघळूज ता.आष्टी ) अशी जखमींची नावे आहेत. आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील तिघे जण जालना येथे विवाह समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपून परत गावाकडे येत असताना जीप देविनिमगावजवळ येताच चालू जीपची लाईट अचानक बंद झाली. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्या कडेला असलेल्या पन्नास फूट खोल विहिरीत जीप पडली. जीप विहिरीत कोसळताच पूर्णपणे काळोख होता. नशिबाने साथ देत हे तिघेही विहिरीच्या पायर्यावरून वरती आले. नेमके याचवेळी देवीनिमगाव येथील शिक्षक सचिन मार्कंडे व महाराज फाळके हे दोघे गावाकडे जात असताना त्यांनी हा अपघात पाहताच जखमींना तात्काळ मदत केली. जखमींना कडा येथील डॉ.महेंद्र पटवा यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींची त्यांची प्रकृती स्थिर आहे.
-----
Leave a comment