पुणे । वार्ताहर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ही उत्तरसूची सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
राज्यात 16 फेब्रुवारीला शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आली होती. 4 मार्च रोजी या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली होती. त्यावर विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा यांच्याकडून ऑनलाईन आक्षेप मागविण्यात आले होते. यात सुमारे 2 हजार 500 आक्षेप नोंदविण्यात आले होते. या आक्षेपांची विषय तज्ज्ञांकडून तपासणी करण्याचे नियोजन मार्चमध्ये करण्यात आले होते.
राज्यात मार्च महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनही करण्यात आले. यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील विषय तज्ज्ञांना परीक्षा परिषदेच्या कार्यालयात येणे शक्य झाले नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिका, उत्तरसूची याबाबतच्या आक्षेपांची तपासणी सतत लांबणीवर पडली होती. त्यामुळे निकालाचे कामकाज ठप्प पडले होते. अखेर परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, आयुक्त तुकाराम सुपे, सहायक आयुक्त व शिष्यवृत्ती विभाग प्रमुख स्मिता गौड, प्रशासन अधिकारी संजय काळे आदींनी बैठक घेऊन अंतिम उत्तरसूचीबाबतच्या कामकाजाचे योग्य ते नियोजन करुन त्याची अंमलबजावणी केली.
लॉकडाऊनच्या कालावधीत पर्याय शोधून परीक्षा परिषदेने उत्तरसूचीसंदर्भातील आक्षेपांची तपासणी करण्यासाठी विषय तज्ज्ञांच्या झूम द्वारे सात-आठ वेळा बैठका घेतल्या. एकेका प्रश्नाच्या उत्तरावर चर्चा करुन उत्तरसूचीबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अंतिम उत्तरसूचीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता या उत्तरसूचीबाबत कोणतीही निवेदने स्वीकारण्यात येणार नाहीत व त्यावर कोणताही पत्रव्यवहारही करण्यात येणार नाही.
या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकालाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. येत्या 15 जुलैपर्यंत अंतरिम निकाल जाहीर होण्याची शक्यताही वर्तविण्यात आलेली आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये गुणवत्ता यादी व अंतिम निकाल लावण्यात येणार आहे.
Leave a comment