मुंबई -
राज्य सरकार अस्थिर करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सत्ताधार्यांकडून करण्यात येत आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनीदेखील राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे आज मंगळवारी (दि.26) संध्याकाळी 4 वाजता माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतील याकडे सत्ताधार्यांसह सार्यांचे लक्ष लागले आहे.
सोमवारी मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या खासगी निवासस्थानी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये दीड तास चर्चा सुरु होती अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. सोबतच कोणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असेल तर ती निव्वळ पोटदुखी समजावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे. मात्र असं असलं तरी राज्यपालांच्या भेटीसाठी नेत्यांची रांग लागल्याने, महाराष्ट्र भाजपाने सरकारविरोधी आंदोलन सुरु केल्याने आणि त्यातच राणेंनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. करोनाची परिस्थिती हाताळण्यात महाविकास आघाडीचं सरकार अपयशी ठरल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून सतत विरोधीपक्षाकडून करण्यात येत आहे. त्यातच यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा रंगलेल्या परिस्थितीवरूनही विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची संध्याकाळी पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यामुळे ते या पत्रकार परिषदेत काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Leave a comment