कोरोना वोरियर उपनिरीक्षकाचे घरी परतल्यावर आगळंवेगळं स्वागत
जालना । वार्ताहर
मालेगावसारख्या कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या भागात कर्तव्य बजाबून घरी परतलेल्या जालना येथील राज्य राखीव पोलिस बलाच्या एका उपनिरीक्षकाचे घरी परतल्यानंतर पत्नी व नातेवाईकांनी पुष्पवृष्टीने तर वृद्ध आईने पारंपरिक पद्धतीने दृष्ट काढत स्वागत केलं तर त्या कोरोना योद्धा उपनिरीक्षकाने देखील सॅल्यूट मारून या सत्काराची परतफेड केली.
धर्मेंद्र खांडेकर असं या अवलियाचं नाव असून तो राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 3 येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराने जगभरात थैमान घातलं असून सामान्य जनता मात्र यामुळे फारच धास्तावलीय. पण अश्या बिकट परिस्थितीत देखील पोलीस बांधव मात्र स्वतःचे कुटुंब वार्यावर सोडून आपल्या जीवाची परवा न करता ऑन ड्युटी 24 तास राबताहेत.खांडेकर आपल्या कंपनीसोबत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कोरोना बंदोबस्तावर गेले होते. मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढला की, तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिस उप निरीक्षक खांडेकर यांच्या अनेक सहकारी पोलिस जवानांना कोरोनाने ग्रासले. परंतु न डगमगता खांडेकर यांनी मालेगावमध्ये आपला कर्तव्य काळ पूर्ण केला. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून खांडेकर यांच्यासह इतर 67 जवानांना भोकरदन येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कवारांटाईन करण्यात आलं होतं. दरम्यान, 20 दिवस कवारांटाईन राहून कोरोना स्वॅब टेस्ट निगेटिव् ह आल्यामुळे त्यांना आता घरी पाठविण्यात आले.
Leave a comment