आष्टी । वार्ताहर
तोंडाला मास्क न बांधता शहरातील बाजारपेठेत प्रवेश करण्यास रोखल्यानंतर दोन भावांनी मिळून दोन पोलिस कर्मचारी व होमगार्डवर हल्ला चढवत काठीने मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत एक पोलिस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे.शनिवारी (दि.9) शहरातील कमानवेशीजवळ हा प्रकार घडला. याबाबत दोघा भावांविरुद्ध आष्टी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शांतीनाथ राजाराम फुंदे (40) व शरद राजाराम फुंदे (45, दोघे रा. शेकापूर, हल्ली मुक्काम पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या भावांची नावे आहेत.शनिवारी सकाळी कमानवेशीजवळ पोलिस शिपाई सचिन कोळेकर, रियाज पठाण व होमगार्ड शैलेश वांढरे हे बंदोबस्तावर होते.यावेळी शांतीनाथ राजाराम फुंदे व शरद राजाराम फुंदे हे दोघे भाऊ बाजारपेठेत आले. तोंडाला मास्क न बांधता ते बाजारपेठेत प्रवेश करू इच्छित असल्याने कर्तव्यावरील पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. याचा राग मनात धरून या दोघांनी सचिन कोळेकर,रियाज पठाण व शैलेश वांढरे यांना काठीच्या सहाय्याने मारहाण करण्यास सुरवात केली.या मारहाणीत वरील तिघे जण जखमी झाले. पोलिस शिपाई सचिन कोळेकर यांच्या डोक्याला काठीचा जोराचा मार लागल्याने त्यांना उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. याबाबत रियाज पठाण यांनी आष्टी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून शांतीनाथ फुंदे व शरद फुंदे या दोघा भावांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा तसेच राष्ट्रीय आपत्ती कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Leave a comment