माजलगाव / उमेश जेथलिया
माजलगाव मतदार संघातील चौरंगी लढतीत सत्ता परिवर्तनाच्या लाटेचा, आरक्षणाच्या वादळाचा ,शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा ,धर्म निरपेक्ष विचाराचा फायदा महाविकास आघाडीचे मोहन जगतापाना होणार की विकासाच्या मुद्द्याचा, बटेंगे तो कंटेंगेच्या भावनांचा फायदा महायुतीचे प्रकाश सोळंकेना होणार की ओबीसीच्या सुप्त लाटेचा फायदा निर्मळना होणार की सहानुभूतीच्या लाटेचा,महायुती की महाविकास आघाडी निश्चित नसल्यामुळे जनतेला अंधारात ठेवल्याचा फायदा रमेश आडसकर यांना होणार असे एक न अनेक गणित माजलगाव मतदार संघातील सुज्ञ मतदार राजकीय विश्लेषक लावत आहेत. महाविकास आघाडीच्या मतदारात एकजूट तर महायुतीच्या मतदारात मोठी फूट दिसत असली तरी गणित जुळेना किंवा जुळालेल्या गणितावर विश्वास राहिना अशी अवस्था माजलगवकर मतदारांची होत आहे.शिवाय लोकसभेला सुरु झालेला ओबीसी मराठा वाद कोणाचे गणित बिघडवतो तेही कळण्यास मार्ग नाही.
स्थानिक की उपरा प्रश्न ...जनतेत संभ्रम
खरं पाहिले तर एवढ्या मोठ्या निवडणुकीत निवडून येणारा आमदार हा स्थानिकांचा असणे गरजेचे असते. छोट्या छोट्या कामासाठी 2014 ते 19 मध्ये जनते सह कार्यकर्ते परळीला चक्करा मारत होते.या वाईट अनुभवानंतर ही माजलगावचा मतदार 2004 नंतर प्रथमच दोन्ही पक्षाकडून स्थानिक उमेदवार असताना उपऱ्या उमेदवारांना स्थान देतो का हे पण महत्वाचे आहे.
आठरा पगड जातीची साथ जगतापानां मिळणार का?
आठरा पगड जातीचा उमेदवार म्हणुन महाविकास आघाडीचे मोहन जगाताप यांची ओळख असली तरी ओबीसी मराठा वादाचा काही परिणाम होऊन त्यांना आठरा पगड जातींच्या मतांना मुकावे लागते की आठरा पगड जाती त्यांच्या सोबत राहतात हे निवडणुकीनंतरच कळेल.
आडसकराच्या उमेदवारीने मराठा मताची विभागणी
महायुती व महाविकास आघाडी कडून मराठा उमेदवार असले तरी रमेश आडसकर यांनी 2019 चीं निवडणूक भाजप कडून पराभूत झाल्यानंतर यंदा सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन अपक्ष अर्ज भरला असला तरी केवळ मराठा मताची विभागणी सोडता त्यांच्या हाती काही लागेल असे वाटतं नाही.
औरंगाबाद उस्मानाबाद आडसकरांना तारणार?
अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांनी उर्दूतून छापलेल्या जाहीरनाम्यात औरंगाबाद व उस्मानाबाद चे नामांतर केल्याबद्दल आघाडी सरकारला दोषी ठरवले यामुळे मुस्लिम मताची टक्केवारी वाढते की मराठा टक्केवारी कमी होते हे सुद्धा आडसकर यांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.
ओबीसीचीं सुप्त लाट धक्कादायक निकाल देणार?
लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर माजलगाव मतदार संघात असलेल्या 1 लाख 30 हजार ओबीसी मतदारात अस्वस्थता होती या अस्वस्थतेला माधव निर्मळ यांच्या रूपाने वाट मिळाल्याचे प्रारंभी दिसून आले. मात्र त्यांच्या गाडीला अडवणे, त्यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी आणलेला दबाव, त्यांच्या चुकीच्या निशाणीचे पत्रक वाटणे यातून ओबीसीचीं लाट सुप्त होत गेली ही लाट मतदानातून चमत्कार दाखवून धक्कादायक निकाल देते का हे सुद्धा पहावे लागण्याची शक्यता आहे.
आ सोळंकेना विकास जिंकवणार की स्वभाव हरवणार ?
आ सोळंकेनी चार वेळा मतदार संघांचे प्रतिनिधित्व करून अनेका प्रलंबित प्रश्न मार्गी लावले असले तरी मागील 5 वर्षात त्यांचे सामान्य माणसापासून गुत्तेदारा पर्यंत सर्वाशी वागण, त्यांचा स्वभाव पाहता विकास जिंकवणार की स्वभाव हरवणार हेही 23 ला कळेल.
Leave a comment