चंदीगढ: हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल्स आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवत भाजप पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्मनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही. मात्र, मतमोजणीचे सध्याचे कल पाहता भाजप हरियाणात तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची किमया साधू शकतो. शेतकरी आंदोलन आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे देशव्यापी नाचक्की झाल्यामुळे हरियाणातील परिस्थिती भाजपसाठी (BJP) प्रतिकूल मानली जात होती. मात्र, ही सगळी आव्हाने झुगारत भाजप सध्या दमदारपणे सत्तेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
सकाळी 11 वाजेपर्यंतच्या मतमोजणीच्या कलानुसार 90 जागा असलेल्या हरियाणा विधानसभेत भाजप 48, काँग्रेस 36, लोक दल 1 आणि 5 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. हरियाणा विधानसभेत 46 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे भाजपकडे एकहाती बहुमत आहे. पुढील काही तासांमध्ये भाजपच्या जागा घटल्या तरी त्यांना अपक्षांची मदत मिळू शकते. आघाडीवर असलेल्या अपक्ष उमेदवारांपैकी बहुतांश भाजपचे बंडखोर आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी गरज पडल्यास हे बंडखोर भाजपलाच साथ देतील, असा अंदाज आहे. त्यामुळे या क्षणापर्यंत हरियाणात भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपने हरियाणात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यास देशभरातली विशेषत: महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला काहीसा फटका बसला होता. मात्र, हिंदी पट्ट्यातील हरियाणात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यास भाजप कार्यकर्त्यांच्या मनातील निराशेचे मळभ दूर होण्यास मदत होऊ शकते.
Leave a comment