बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यातील 17 लाख 14 हजार 431 शेतकऱ्यांनी अवघ्या 1 रुपयात पीकविमा भरण्यासाठी इतर कागदपत्रांसाठी तीनशे चारशे रुपये खर्च करून अखेर दिलेल्या मुदतीत 7 लाख 75 हजार 662 क्षेत्रातील पिकांचा विमा कंपनीकडे भरला आहे. 1 ऑगस्ट ही पीकविमा भरण्यासाठी अंतिम मुदत होती.या कालावधीत किती शेतकऱ्यांनी विमा भरला हे विचारल्यानंतर बीड मधील पीकविमा कंपनीच्या व्यवस्थापणाकडून माहिती देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
बीड जिल्ह्यात यंदा खरीपाचे 7 लाख 85 हजार 786 हे. क्षेत्र असून 7 लाख 74 हजार 848 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पैकी 7 लाख 75 हजार 662 क्षेत्रावरील पिके शेतकऱ्यांनी विमा संरक्षित केले आहेत तर काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे.म्हणूनच 19 हजार 186 हेक्टरचा पीक विमा भरण्यात आला नसल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जिल्ह्यात कापसाच्या तुलनेत सोयाबीन आणि तुरीची पेरणी अधिक झालेली आहे. दरवर्षी बीड जिल्ह्यात खरिप हंगामात शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मुग, सुर्यफुल आणि मका या पिकांची पेरणी करून उत्पादन घेत असतात.
जिल्ह्यात जून व जुलै या दोन महिन्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 57.06 टक्के पाऊस झाला आहे. दुसरीकडे 4 टक्क्यांवर पोहचलेला प्रकल्पीय पाणीसाठा आता सततच्या पावसामुळे वाढून 57.6 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मात्र अजूनही जिल्ह्यात अजूनही 19 प्रकल्प कोरडे आहेत. तर 70 प्रकल्पांची पाणीपातळी ज्योत्याखाली गेलेली आहे.जिल्ह्यात मागील दिवसांत झालेल्या पावसामुळे 2 मध्यम व 10 लघू असे 12 प्रकल्प 100 टक्के क्षमतेने भरले आहेत.एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे पीक कर्जही शेतकऱ्यांना बँकांकडून वितरित केले गेलेले आहे.
बीड तालुक्यातील 2 लाख 45 हजार 440 शेतकऱ्यांनी 97 हजार 245 हेक्टर क्षेत्रावरील पीकविमा भरला तर आष्टी तालुक्यातील 2 लाख 29 हजार 997 शेतकऱ्यांनी 81 हजार 499 हेक्टर क्षेत्रावरील पिके विमा संरक्षित केली आहेत. तसेच अंबाजोगाई तालुक्यात 1 लाख 3 हजार 202 शेतकऱ्यांनी 76 हजार 184 हेक्टर क्षेत्र पीक संरक्षित केले आहे.
धारूर तालुक्यात 82 हजार 666 शेतकऱ्यांनी 41 हजार 99 हेक्टर, गेवराई तालुक्यात सर्वाधिक 2 लाख 96 हजार 599 शेतकऱ्यांनी 1 लाख 2 हजार 944 हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा भरला. यासोबतच केज तालुक्यातील 2 लाख 22 हजार 73 शेतकऱ्यांनी 1 लाख 10 हजार 46 हे.पिकांसाठी विमा भरला आहे. माजलगाव तालुक्यातील 1 लाख 2 हजार 6 शेतकऱ्यांनी 73 हजार 648 हेक्टर पिके विमा संरक्षित केली असून परळीत 1 लाख 11 हजार 307 शेतकऱ्यांनी 50 हजार 2 हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा ऑनलाइन भरला आहे. पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील अनुक्रमे 1 लाख 32 हजार 971 शेतकऱ्यांनी 39 हजार 825 हे.क्षेत्रातील पिकांसाठी विमा भरला आहे, तसेच वडवणी तालुक्यातील 54 हजार शेतकऱ्यांनी 27 हजार 924 हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी विमा भरला आहे.गत वर्षीच्या तुलनेत पीक विमा भरणाऱ्यांची संख्या 1 लाख 28 हजारांनी कमी झाल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते.
Leave a comment