बीड । वार्ताहर
तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीतील स्लॅब खराब झाला असुन पावसाळ्यात थेंब थेंब पाणी टपकत असुन इमारत पुर्णतः जीर्ण झालेली आहे. इमारतीच्या स्लॅब मधुन पावसाचे पाणी झिरपत असल्याने सध्या तपासणी कक्ष,बाळंतिनी कक्ष, बाह्य रुग्ण विभाग, बैठक कक्ष, आंतररुग्ण विभाग,औषधी विभाग, व्हरांडा याठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असलेल्या खेड्यापाड्यातील गरिब रूग्णांची हेळसांड होत आहे.
बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचक्रोशीतील 12 वाड्यातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र गेल्या 3-4 वर्षांपासून पावसाळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य इमारतीसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानांची दुरावस्था झाली आहे. निवासस्थाने पुर्णपणे नादुरुस्त असुन पावसाळ्यात पुर्ण गळती लागलेली आहे.स्वच्छतागृहे नादुरुस्त असुन पावसाळ्यात साप व विंचू आढळून येतात. त्यामुळे तेथे वास्तव्य करण्यास अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहु शकत नाहीत असे पत्र तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा रकटे यांनी दि.14 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना लेखी पत्रकाद्वारे कळविले होते.परंतु अद्याप निवासस्थाने दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी सांगितले.आरोग्य विभागाच्या बांधकाम व देखभाल दुरुस्तीसाठी केवळ वार्षिक नियोजन निधीतून तरतूद करण्याची तरतूद असुन येत्या 15 दिवसात होणार्या वार्षिक नियोजन बैठकीत याकडे प्राधान्याने लक्ष देऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ यांनी म्हटले आहे.
सुविधांचा अभाव-डॉ.गणेश ढवळे
राज्याच्या आरोग्य विभागाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली असुन एकीकडे आरोग्य विभागाच्या रूग्णालय ईमारत बांधणीसाठी तसेच देखभाल व दुरुस्तीसाठी वित्त विभागाकडून पुरेसा निधी दिला जात नाही तर दुसरीकडे हजारोंनी रिक्त असलेली वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांची रिक्त पदे भरली जात नाहीत.ग्रामीण भागातील आरोग्याची मदार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत वाईट आहे.याकडे शासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे असे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले. तसेच लिंबागणेश आरोग्य केंद्राच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी जि.प.सीईओ संगीतादेवी पाटील यांच्यासह डीएचओ डॉ.उल्हास गंडाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Leave a comment