हजारो वारकर्यांनी केला मुक्ताईंचा जयघोष; आज पालखी सोहळ्याचे बीडमध्ये होणार आगमन
बीड । सुशील देशमुख
श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून आषाढी वारीसाठी भगवंत पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे प्रस्थान करत असलेला संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा मंगळवारी पाडळशिंगी (ता.गेवराई) येथे मुक्कामी विसावला आहे. तत्पूर्वी मंगळवारी (दि.2) दुपारी 2 वाजता गढी (ता.गेवराई) येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर हजारो वारकर्यांच्या उपस्थितीत संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यातील बीड जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण पार पडले.
टाळ-मृदंगाच्या निनादात मुक्ताई....मुक्ताई... आदिशक्ती मुक्ताई... अन् विठूनामाचा जयघोष करत आसमंत उत्साही करत वारकर्यांनी पंढरीच्या वारीचा आनंद व्यक्त केला. पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, श्रीक्षेत्र मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र महाराज पाटील यांच्यासह ज्ञानेश्वर महाराज हरणे, लखन महाराज, पंकज महाराज, सोमनाथ महाराज, गणेश महाराज, प्रेम महाराज, राम महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान श्री संत मुक्ताईंचा पालखी सोहळ्याचे आज दि. 3 जुलै रोजी बीड शहरात आगमन होणार आहे.
श्री संत मुक्ताईंचा पालखी सोहळ्याचे यंदाचे 315 वे वर्षे असून शेकडो वर्षांची ही परंपरा कायम ठेवणारा संत मुक्ताईंचा पालखी सोहळा महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायासाठी अभिमानास्पद आहे. श्री संत मुक्ताईंचा पालखी सोहळ्याचे आज दि. 3 जुलै रोजी बीड शहरात आगमन होणार आहे. शहरातील माळीवेस येथील हनुमान मंदिरात संत मुक्ताईंच्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत.
त्यानंतर रात्री माळीवेस येथील हनुमान मंदिरात मुक्कामी थांबून 4 जुलै रोजी मुक्कामासाठी पेठेतील बालाजी मंदिरात पोहचणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात असून या पालखी सोहळ्यात 3 हजार महिला-पुरुष वारकरी विठु नामाच्या जयघोषात पंढरीकडे प्रस्थान करत आहेत.श्री संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यात दरवर्षी दिंड्या सहभागी होत असतात. यंदा या सोहळ्यात 100 हून अधिक छोट्या दिंड्यातून वारकरी सहभागी झाले आहेत.
श्री संत मुक्ताबाई संस्थान मुळ मंदिर मुक्ताईनगर येथून 18 जून रोजी पालखीने पंढरीकडे प्रस्थान ठेवले आहे. ठिकठिकाणचा पायी प्रवास करत 14 जुलै रोजी संत मुक्ताईंचा पालखी सोहळा पंढरपुरमध्ये दाखल होणार आहे. या पालखी सोहळ्यात महिला, पुरुष वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. श्री संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यासोबत 2 बैलजोडी व 2 अश्व असतात.
यातील 2 बैलजोडी नाचनखेडा (मध्यप्रदेश) येथील राजेश पाटील हे पालखीसाठी देत असतात.यंदाही त्यांनी बैलजोडी संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. ही बैलजोड बीडपासून पुढे मांजरसुंब्याकडे जातांना संत मुक्ताईंचा रथ ओढते. यावेळी वारकरीही विठू नामाच्या जयघोषात तल्लीन झालेले असतात.
यंदा परिसरातील छोट्या दिंड्यांनाही संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात सहभागी करुन घेतले जाणार असल्याने पालखी सोहळ्यातील वारकर्यांची संख्या वाढणार आहे.
यंदा राज्य शासनाने वारकर्यांची अतिशय चांगली सेवा केली असून पालखी सोहळ्या सोबत एक रुग्णवाहिका देण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांचे पथकही सोबत आहे. राज्य शासनाचे आम्ही आभार मानत असल्याची प्रांजळ भावना रविंद्र महाराज पाटील यांनी व्यक्त केली.
Leave a comment