
अंबाजोगाई । वार्ताहर
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे 2 जुलै मंगळवारी दुपारी अंबाजोगाई शहरात आगमन झाले. टाळ मृदंगाच्या तालावर शेकडो वारकर्यांनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामांच्या गजरात ठेका धरला. ’पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल, संत गजानन महाराज की जय,गण गण गणात बोते’ या जयघोषाने एकापाठोपाठ सुंदर चालीवर भजने म्हटली.

प्रस्थानाच्या मार्गावर विविध गावांमध्ये शहरांमध्ये संत गजानन महाराज पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत आणि पूजा केली जाते.पालखीचे हे 55 वे वर्ष असून पालखीत शेगाव येथून अश्व आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी आहेत.

यात काही टाळकरी तर काहींच्या हाती भगव्या पताका आहेत. संत गजानन महाराज पालखी सोहळा हा अत्यंत शिस्तबद्ध व विशिष्ट पद्धतीने मार्गक्रमण करणारा म्हणून ओळखला जातो.

श्री संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असून रात्री भजन कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. नंतर03 जुलै बुधवार रोजी सकाळी संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.





ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment