अफवांवर विश्वास ठेवू नका:एसपी नंदकुमार ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन
बीड | वार्ताहर
शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावात गुरुवारी (दि.२७) रात्री दोन गटात झालेल्या तुफान राड्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान रात्री उशिरा पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. तसेच परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आली आहे.कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.
ओबीसी आंदोलक प्रा.लक्ष्मण हाके हे गोपीनाथ गड येथून दर्शन घेऊन भगवान गडाला जाणार होते. त्यांच्या स्वागतासाठी तींतरवणी, माळेगांव येथील ग्रामस्थ दुचाकी रॅली आणि डीजे लावून पाडळशिंगीकडे निघाले होते. त्यांची रॅली मातोरी गावात आल्यानंतर रॅलीतील तरुणांनी त्या गावात डीजे लावून नाचण्यास सुरुवात केली. डिजेवर एक दोन गाणे डान्स केल्यानंतर मोठी ट्रॅफिक जॅम झाली. त्यामुळे मातोरी ग्रामस्थांनी या तरुणांना इथे डीजे वाजवू नका म्हणून सांगितले. त्याच कारणावरून ग्रामस्थ आणि तरुणांमध्ये बाचाबाची झाली.
यावेळी रॅलीमधील काही तरुणांनी शिवीगाळ सुरु करीत एका हॉटेलवर दगड भिरकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेकीला सुरुवात झाली. यात काही जणांना मार लागला आहे. तर चार ते पाच दुचाकीवर दगड मारून त्यांचे नुकसान करण्यात आले आहे. तर डिजेचे देखील नुकसान करण्यात आले आहे. तर महामार्गावर गाड्या अडवून त्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार देखील घडले आहेत. घटनेची माहिती समजल्यानंतर चकलंबा पोलिस आणि बीड जिल्ह्याचे राखीव पोलिस व इतर अधिकारी यांनी तातडीने गावात पोहोचून त्यांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये
शिरूर कासार तालुक्यातील मातोरी येथे दोन गटात दगडफेक आणि दुचाकीवर दगड मारून नुकसान केल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह अप्पर अधीक्षक, डीवायएसपी आणि स्थानिक पोलिसांनी मातोरी गावात धाव घेतली.या ठिकाणी सध्या राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आली आहे.कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.
Leave a comment