गतवर्षी याच कालावधीत केवळ 3.4 टक्के पाऊस
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात यंदा जूनच्या 25 दिवसात समाधानकारक पाऊस झाला नसला तरी पेरणी योग्य पाऊस नक्कीच झाला आहे. या पावसाच्या जोरावरच खरीपाच्या तब्बल 78 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मागील 24 दिवसात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 176.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण 31.2 टक्के आहे. महत्त्वाचे हे की, गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात केवळ 3.4 टक्के इतका पाऊस झाला होता.
बीड जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 566.1 मिलिमीटर आहे मागील 24 तासात जिल्ह्यात 5.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर 24 दिवसात 176.8 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. जून महिन्यातच खरीपाच्या पेरण्या पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस शिरूर कासार तालुक्यात 215 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. याशिवाय अंबाजोगाई तालुक्यात 202.8 मिलिमीटर, बीड तालुक्यात 161 मिलिमीटर, पाटोदा 184.2 मिलिमीटर, आष्टी 185.6 मिलिमीटर, गेवराई 198.9 मिलिमीटर, माजलगाव 154.5 मिलिमीटर, केज 176.8, मिलिमीटर, परळी 148.3 मिलिमीटर, धारूर 180.8 मिलिमीटर व वडवणी तालुक्यात 120.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील पंधरा दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या पूर्ण करण्यावर भर दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे कापसापेक्षा सोयाबीनचा पेरा अधिक आहे.
Leave a comment