पाच तालुक्यात 137 हेक्टरवरील बागायत अन् फळपिकांचे झाले होते नुकसान
बीड । सुशील देशमुख
जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यासंदर्भात कृषी विभाग आणि महसूल यंत्रणेने शेत पिकांच्या पंचनामे केल्यानंतर त्याचा विस्तृत अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता दरम्यान शासन निर्णय 1 जानेवारी 2024 नुसार हवेली पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत दिली जाते, त्यासाठी आता मे महिन्यात जिल्ह्यात बागायत आणि फळपिके असे एकूण 137 हेक्टर 44 आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी 46 लाख 82 हजार 520 रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
जिल्ह्यात बीड, पाटोदा, केज, अंबाजोगाई, माजलगाव या पाच तालुक्यातील 306 शेतकर्यांचे मे महिन्यात झालेल्या अवेळी पाऊस व गारपिटीमुळे 29.48 हेक्टर क्षेत्रावर बागायत तर 107.96 हेक्टर क्षेत्रावरील फळ पिके असे एकूण 137.44 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते यामध्ये बागायत साठी प्रति हेक्टर 27 हजार रुपयांचे अनुदान राज्य शासनाकडून दिले जाते; तर फळपिकांसाठी प्रती हेक्टरी 36 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाते.
जिल्ह्यातील पाच तालुक्यात बागायत क्षेत्रावर ते 33 टक्क्यांपेक्षा जास्त झालेल्या नुकसान भरपाई पोटी सात लाख 95 हजार 960 रुपयांची अनुदान मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नुकतीच केली आहे याबरोबरच फळ पिकांच्या नुकसान भरपाईपोटी 38 लाख 86 हजार 560 रुपयांची मागणी करण्यात आली असून एकूण 46 लाख 82 हजार 520 रुपये इतकी अनुदान मागणी केली गेली आहे.20 जून रोजी यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी नुकसानीचा अहवाल प्रपत्र ‘ड’मध्ये राज्य शासनाकडे पाठवला आहे.
तालुकानिहाय असे आहे नुकसान
पाटोदा तालुक्यातील 4 शेतकर्यांचे बागायत व फळपिकांच्या 0.90 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान भरपाईसाठी एकूण 27 हजार 990 रुपयांची मागणी करण्यात आली आहे. केज तालुक्यातील 165 शेतकर्यांच्या बागायत व फळपिकांच्या 98 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी 33 लाख 75 हजार रुपये, अंबाजोगाई तालुक्यातील 8 शेतकर्यांच्या 2.85 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान भरपाईसाठी 8 लाख 89 हजार 100 रुपये तसेच धारूर तालुक्यातील 57 शेतकर्यांच्या 22 हेक्टर 30 आर क्षेत्रावरील नुकसान भरपाईसाठी 7 लाख 28 हजार 100 रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याबरोबरच परळी तालुक्यातील 72 शेतकर्यांचे बागायत व फळ पिकांचे 13.39 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले होते. याचा मोबदला म्हणून 4 लाख 62 हजार 330 रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
Leave a comment