बीड | वार्ताहर
बीड जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पोलीस भरती दरम्यान दि. २३ जून रोजी पडलेल्या पावसामुळे कवायत मैदानावर पाणी साचले असून चिखलही झाला आहे. त्यामुळे दि.२४ जून रोजी होणारी पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी आता येत्या १ जुलै रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर १९ जूनपासून जिल्हा पोलीस दलातील रिक्त १७० पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी शारीरिक व मैदानी चाचणी सुरू असताना २३ जून रोजी दुपारी १२ वा दरम्यान तसेच सायंकाळी ४ वाजेदरम्यान कवायत मैदानावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मैदानावर पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे उद्या दि.२४ जून २०२४ रोजी १००९ उमेदवारांची आयोजित केलेली मैदानी चाचणी नैसर्गिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे.
सदरील मैदानी चाचणी दि. १ जुलै २०२४ रोजी पहाटे ५.३० वा. निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. दि.२४ रोजी पोलीस भरती २०२२-२३ करीता या घटकात मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांनी दि. १ जुलै २०२४ रोजी पहाटे ५.३० वा. कवायत मैदान, पोलीस मुख्यालय बीड येथे हजर रहावे असे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कळविले आहे.
Leave a comment