राष्ट्रीय महामार्गासह राज्य व इतर मार्गावर अपघात वाढले

 

बीड । सुशील देशमुख

जिल्ह्यात 1 जानेवारी ते मे 2024 या पाच महिन्यात 181 प्राणांतिक अपघात झाले. यात तब्बल 200 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 178 पुरुषांचा तर 22 महिलांचा समावेश आहे. अवघ्या पाच महिन्यात अपघाती मृत्यूंचा आकडा ह्रदय पिळवटून टाकणारा आहे.
वाढते रस्ते अपघात चिंताजनक आहेत. वाहनाच्या गतीवर वेळीच नियंत्रण ठेवले तर अपघातांची संख्या आटोक्यात येवू शकते. अपघातांमुळे मृत्यू ओढवलेल्या कुटूंबाची कधीही भरुन न येणारी हानी होते तर अपघातांमुळे येणार्‍या अपंगत्वामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी चांगले, दर्जेदार रस्ते तयार झाले. काही ठिकाणी सिंमेट रस्तेही तयार झाले आहेत.मात्र हेच पोटातील पाणीही हलणार नाही अशा गुळगुळीत रस्त्यांवर वाहनचालकांना वेगाचा मोह आवरला नाही तर गंभीर अपघाताला निमंत्रण देत असल्याचे गत पाच महिन्यातील आकडेवारीवरुन दिसून येते.

 

बीड जिल्ह्यात 1 जानेवारी ते मे 2024 अखेरपर्यंत राष्ट्रीय महार्गावर 31, राज्य महामार्गावर 89 व इतर रस्त्यांवर 61 असे एकूण 181 अपघात झाले. या सर्व अपघातांमध्ये दुर्देवाने 178 पुरुष तर 22 महिलांचा मृत्यू झाला. प्राणांतिक अपघाताची ही आकडेवारी धक्कादायक मन विषन्न करणारी आहे. दरम्यान जिल्ह्यात याच कालावधीत झालेल्या 143 गंभीर स्वरुपाच्या अपघातात 212 पुरुष व 49 महिला असे 261 जण गंभीररित्या जखमी झाले. याशिवाय 17 किरकोळ अपघातांच्या घटना घडल्या असून त्यात 31 पुरुष व 14 महिला असे एकूण 45 जण जखमी झाले असल्याचे जिल्हा विशेष शाखेकडील आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

 

 

बीड जिल्ह्याच्या पूर्वेला परभणी, पश्चिमेला अहमदनगर, उत्तरेला जालना आणि औरंगाबाद, आणि दक्षिणेला लातूर आणि धाराशिव जिल्हा आहे. सोलापूर-छत्रपती संभाजीनगर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र.52 हा बीड जिल्ह्यातून जातो. हा महामार्ग औरंगाबाद, धुळे, उस्मानाबाद आणि सोलापूर ह्या शहरांना जोडतो तर कल्याण- विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 बीड जिल्ह्यातून जातो. या महामार्गावरून हा जिल्हा गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेशमधील शहरांशी जोडला गेला आहे. बीडपासून मुंबई 450 कि.मी. अंतरावर असले तरी बीड जिल्ह्यातून पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, नादेड, सोलापूर, कोल्हापूर या शहरांकडे होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्य महामार्गावर होणार्‍या अपघातांची संख्या जशी जास्त आहे तशीच ती इतर मार्गावरही वाढत आहे.

आवरा वेगाला...सावरा जीवाला...

वाहन चालवताना चालकांने चाकांमधील हवा आणि इंधनाची तपासणी केली पाहिजे. वाहनावर पूर्ण ताबा असला पाहिजे. वाहनात बसलेल्या इतर सदस्यांसोबत गप्पांमध्ये सहभागी होवू नये. महामार्गावर स्वत:ची लेन सोडून जाऊ नये, महामार्गावर ठिकठिकाणच्या वाहतुकीच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.आवरा वेगाला...सावरा जीवाला... असे अनेक फलक महामार्गावर दिसतात, त्याचे पालन महत्वाचे ठरते.

 

गतवर्षी साडेचारशे जणांचा मृत्यू

बीड जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023  या कालावधीत अपघाताच्या 407 घटना घडल्या होत्या. यात तब्बल 450 नागरिकांचा मृत्यू ओढवला. यात 401 पुरुष व 49 महिलांचा समावेश होता. वर्षभरात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्हा मार्गावर झालेल्या अपघातांची आकडेवारी प्रचंड असून त्यात मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्याही धक्कादायक आहे.

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.