बीड । वार्ताहर
बीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेले 170 पदे भरण्यासाठी 19 जून पासून येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरुवात झाली आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपायांची 164, पोलीस शिपाई चालक पदाची 5 तर पोलीस शिपाई बँड्समॅन हे 1 पद भरले जाणार आहे. पोलीस शिपाई पदांसाठी 7 हजार 545, चालक पोलीस शिपाई पदासाठी 693 तर पोलीस शिपाई बँड्समन पदासाठी 191 आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत. दरम्यान भरतीसाठी बाहेर गावातून आलेल्या उमेदवारांना बीडमध्ये राहण्याची सोय नाही, अशा उमेदवारांना बीड पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालयातील बॅरेकमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे. उमेदवारांनी उघड्यावर किंवा इतर असुरक्षित ठिकाणी न थांबता पोलीस बॅरेकमध्येच रहावे, उमेदवारांनी स्वतःकडे पोलीस भरतीचे ओळखपत्र सोबत ठेवावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.
पोलीस शिपाई पदासाठी प्राप्त झालेल्या एकूण 7 हजार 545 अर्जापैकी 6 हजार 201 अर्ज पुरुष उमेदवारांचे व 1 हजार 344 अर्ज महिला उमेदवारांचे प्राप्त झाले आहेत. 19 जून ते 28 जून या कालावधीत संपूर्ण भरती प्रकिया सुरु राहिल. यात 19 रोजी पोलीस शिपाई पदासाठी 500 उमेदवारांना सकाळी साडेपाच वाजता बोलावले जाईल. 20 रोजी 750, तर 21, 22, 23, व 24 जून रोजी दररोज 1 हजार उमेदवारांची मैदानी चाचणी होईल. तेस 25 रोजी 951 व 26 जून रोजी 1 हजार 344 उमेदवारांची शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी होईल. नंतर 27 रोजी पोलीस शिपाई बॅन्डस्मॅन या पदासाठीच्या 191 उमेदवारांची मैदानी चाचणी होवून दि. 28 जून रोजी पहाटे साडेपाच वा. चालक पोलीस शिपाई पदाच्या 993 उमेदवारांची शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी होणार आहे.
असे आहे नियोजन
उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी कार्यालयीन कर्मचारी यांचे एकूण 9 टेबल तयार करण्यात आले आहेत. पोलीस भरती मैदानावर 1600 मिटर धावणे, महिला उमेदवार यांची 800 किमी धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक, बाबत मैदानी चाचणी घेतली जात आहे. तसेच सर्व उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी व फेस स्कॅन केले जात आहे. प्रत्येक मैदानी चाचणी ठिकाणी पुन्हा सर्व उमेदवार यांची बायोमेट्रीक हजेरी व फेस स्कॅन केले जाईल. 1600 मिटर धावणे, महिला उमेदवार यांना 800 मीटर धावणे, व 100 मिटर धावणे या मैदानी चाचणीसाठी आरएफआयडी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यांत येणार आहे. मैदानी चाचणीचा सर्व परिसर सीसीटिव्ही निगराणीखाली ठेवण्यांत येणार आहे.
Leave a comment