बीड ग्रामीण पोलीसांसह मांजरसुंबा महामार्ग सुरक्षा पथकाची कारवाई
बीड । वार्ताहर
बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत बीड बाह्यवळण रस्त्यावर महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक रविवारी (दि.16) सायंकाळी 5 वाजता पकडला. या कारवाईत 25 लाख 92 हजार रुपये किमतीच्या गोवा गुटख्याच्या 432 गोण्यांसह ट्रक, दोन टॅक्टरचे हेड, दोन मोबाईल व नगदी रुपये असा एकूण 52 लाख 15 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती ग्रामीण ठाणे निरीक्षक एस.डी.बंटेवाड यांनी दिली.
चौसाळा (ता.बीड) येथून गुटखा घेवून जाणारा ट्रक गेवराईकडे जात असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. त्यावरुन बीड बाह्यवळण रस्त्यावर बीड ग्रामीण पोलीसांसह मांजरसुंबा महामार्ग सुरक्षा पथकाने सापळा रचला. एक विटकरी रंगाचा ट्रक ज्याचा पासींग क्र.(आर जे.19 जीडी 4586) हा समोर दिसताच पोलीसांनी ट्रक थांबवला. नंतर ट्रकची ताडपत्री बाजूला करुन आतमध्ये पाहणी केली तेव्हा त्यात 25 लाख 92 हजार रुपये किमतीच्या गोवा गुटख्याच्या 432 गोण्या आढळून आल्या. पोलीसांनी नंतर ट्रक, दोन टॅक्टरचे हेड, दोन मोबाईल व नगदी रुपये असा एकूण 52 लाख 15 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी बीड ग्रामीणचे पो.ना.अंकुश वरपे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी ट्रक चालक मोहम्मद रफीक हनीफ खान (वय 23) क्लिनर वहिद अली मोहम्मद खा (वय 20, दोघे रा.मांगोलाई मोराणी पोखरण, मोरणी जैसलमेर,राज्य राजस्थान), रमजान भाई (पुर्ण नाव माहित नाही), संदीप लकडे (रा.जिंतूर जि.परभणी), बबलू ट्रान्सपोर्ट त्रिपाठी (राज्य कर्नाटक) व अन्य एक अशा सहा जणांविरुध्द ग्रामीण ठाण्यात गुरनं 203/2024 कलम 328, 272, 273, 188, 34 भादंवि नुसार गुन्हा नोंद झाला. पोउपनि नितीन काकरवाल हे अधिक तपास करत आहेत.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. एस.डी.बंटेवाड, उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोह. सुनील अलगट, पोना अंकुश वरपे, पोकॉ. अभिमान जायभाये, मांजरसुंबा महामार्ग सुरक्षा पथकाचे सहायक निरीक्षक दंडगव्हाळ, उपनिरीक्षक घोडके, पोह. गणेश दुधाळ, किशोर जाधव, जाधव,शिंदे, बिक्कड यांनी संयुक्तीकरित्या केली.
Leave a comment